शबनम न्यूज | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक-दोन विषयांत नापास झाल्यामुळे ‘इअर डाऊन’चा फटका बसत आहे. त्यांचे संपूर्ण वर्षच वाया जात आहे. यात विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी ‘पुन्हा परीक्षा घ्या, तसेच कॅरी ऑन द्या’ अशी मागणी करत विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’च्या वतीने सोमवारी (दि. १४) तीव्र आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी ‘वुई वॉन्ट, कॅरी ऑन’च्या घोषणा दिल्या गेल्या. अभ्यास क्रमाची व्याप्ती आणि परीक्षेतील बदलांमुळे त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. आम्हाला ‘कॅरी ऑन’ची सवलत मिळाली नाही, तर आमचे एक वर्ष वाया जाईल. एका विषयांत अनुत्तीर्ण झालेले अनेक विद्यार्थी असून, त्यांचे पूर्ण वर्ष वाया जाणार आहे.
या आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या –
- निकालातील अनियमितता, चुकीचे ग्रेस मार्क्स, फोटोकॉपी व रिव्हॅल्युएशन प्रक्रियेतील त्रुटी तत्काळ दूर करा. निकालाच्या वेबसाइटवर वारंवार बदल होत असून त्यात सातत्य ठेवा.
- अमरावती विद्यापीठाने ‘कॅरी ऑन’ चा निर्णय घेतला आहे, मग पुणे विद्यापीठ का घेऊ शकत नाही? यावर तत्काळ निर्णय घ्या किंवा पुनर्परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही, याची दक्षता घ्या.