शबनम न्यूज | प्रतिनिधी
वाहतूकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालविणाऱ्या चालकास जाब विचारल्याने त्याने रिक्षा चालकावर खुनी हल्ला केला. हीघटना शुक्रवारी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास महाळुंगे येथे घडली.
शशांक नरेंद्रकुमार शुक्ला (वय २२, रा. कार्पोरेशन कंपनी, महाळुंगे, ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गणपत दामोदर कदम (वय ५७, रा. स्मशानभूमी जवळ, माळुंगे इंगळे, ता. खेड, जि. पुणे) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव असून त्यांनी याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कदम हे आपली रिक्षा (एमएच १२ व्हीयू ७०६७) घेऊन जात होते. त्यावेळी बोलेरो वाहनाने अचानक ‘यू-टर्न’ घेतल्याने त्यांनी बोलेरो चालकास जाब विचारला. त्या वेळी आरोपीने त्यांना शिवीगाळ करत रागाच्या भरात गाडीतील लोखंडी रॉडने डोक्यात दोन वेळा आणि हातावर एकदा मारून गंभीर जखमी केले. यात फिर्यादी कदम यांच्या डोक्याला १५ टाके पडले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.