शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी : मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. सातासमुद्रापार पोहोचलेल्या मराठी भाषेचा गोडवा अद्वितीय आहे.मराठी भाषेचे संवर्धन, भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मराठी चित्रपटासारखे माध्यम उपयुक्त ठरणार असून मराठी चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून शहरवासियांना नाममात्र शुल्कात नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, शहरवासीयांनी दोन दिवस चालणाऱ्या या चित्रपट महोत्सवास उपस्थित राहून मराठी भाषा संवर्धनास प्रोत्साहन द्यावे, असे प्रतिपादन महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.
‘मराठी चित्रपट संवर्धन आणि प्रदर्शनास चालना’ या बहूउद्देशीय संकल्पनेतून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि मराठी चित्रपट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नाट्यगृहात चित्रपट’ ही अनोखी संकल्पना राबविण्यात येत आहे. आज या संकल्पनेतून २४ ते २५ मार्च या कालावधीत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आयोजित चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते.
या महोत्सवास उप आयुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मराठी चित्रपट असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस कौस्तुभ कुलकर्णी, प्रमुख सल्लागार व सुप्रसिद्ध अभिनेते निळू फुले यांची कन्या गार्गी फुले,उपाध्यक्ष नितीन धवणे पाटील, विश्वजित बारणे, संध्या सोनावणे, संगीता तरडे, विजया मानमोडे, मुख्य लिपिक देवेंद्र मोरे यांच्या सह शहरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी भाषेतील चित्रपट जगले पाहिजे त्यांचा प्रसार झाला पाहिजे यासाठी या मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. आपण देखील मराठी भाषेचा अभिमान बाळगत मराठी चित्रपट पाहण्यास प्राधान्य दिले पाहिजे यामुळे अधिकाधिक दर्जेदार मराठी चित्रपट आपल्याला पाहायला मिळतील. असे मत यावेळी बोलताना असोशिएशनचे कौस्तुभ कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
या महोत्सवांतर्गत नुकतेच प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट अत्यंत नाममात्र दरात दाखवले जात आहेत. मराठी भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
या चित्रपट महोत्सवात सोमवारी (२४ मार्च) ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुबूमबूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’ हे चित्रपट दाखवले आहेत. आपले आवडते मराठी भाषेतील चित्रपट पाहण्यासाठी विद्यार्थी, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
उद्या (२५ मार्च ) देखील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दिवसभर ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’, ‘इलू इलू’, ‘मुक्काम पोस्ट देवाचं घर’, ‘चिकी चिकी बुम बूम बूम’, ‘श्यामची आई’, ‘संगीत मानापमान’ चित्रपट पुन्हा एकदा दाखवले जाणार आहेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज पाटील यांनी सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर आभार व किरण गायकवाड यांनी मानले.