शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये थेरगाव परिसरातील दाट वस्ती असलेल्या परिसरात 24 मीटर, 12 मीटर, 15 मीटरचे डीपी रोड प्रस्तावित केले आहेत. घनदाट लोकवस्ती असलेल्या थेरगाव परिसरातील ही आरक्षणे रद्द करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक सतीश दरेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सतीश दरेकर यांनी निवेदनाद्वारे मागणी केली. या निवेदनात सतीश दरेकर यांनी नमूद केले आहे की, थेरगाव परिसरात विशेषता: पडवळ नगर, जय मल्हार नगर, अशोक सोसायटी, डोंगरे कॉर्नर, गणेश नगर ,पंचशील कॉलनी या परिसरात पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने नागरिकांना विश्वासात न घेता डीपी रोड प्रस्तावित केले आहे, तसेच 30 मीटर एच सी एम आर टी चे आरक्षण टाकले आहे. यामुळे थेरगाव परिसरातील हजारो नागरिकांची घरे जमीनदोस्त करावी लागणार आहेत. येथील नागरिकांनी अनेक मेहनतीने आपली घरे बांधली आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या विकास आराखड्यामुळे अनेकांची घरे बाधित होणार आहेत त्यामुळे सदर आरक्षण रद्द करावे, अशी मागणी सतीश दरेकर यांनी आपल्या निवेदनाद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.