- मेट्रो आणि रोटरीचा ‘रोटरी ग्रीन वीक’चा संयुक्त उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१ आणि पुणे मेट्रो (महा मेट्रो) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या ‘रोटरी ग्रीन वीक’ या वर्षभर चालणाऱ्या पर्यावरणीय उपक्रमाचा शानदार शुभारंभ मेट्रो स्थानकात पार पडला. कार्यक्रमाचे आयोजन आणि प्रायोजकत्व रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी केले होते.
या उपक्रमाचे प्रमुख पाहुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर होते. यावेळी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल संतोष मराठे, प्रांतीय पर्यावरण विभागाचे प्रमुख ध्रुव फडके, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष केशव माणगे, महा मेट्रोचे कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत सोनवणे, रोटरी क्लब निगडीचे नियोजित अध्यक्ष शशांक फडके, अमोल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
हर्डीकर म्हणाले कि, “परिवर्तनाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. प्रत्येकाने पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची जबाबदारी स्वीकारली, तरच समाजात खरे परिवर्तन घडणे शक्य होईल.”
ध्रुव फडके म्हणाले कि, हा उपक्रम ५२ आठवड्यांचा असून दर आठवड्याला एक सोपी, पण प्रभावी पर्यावरणपूरक कृती राबवण्याचे उद्दिष्ट आहे. उदाहरणार्थ – स्वतःची पाण्याची बाटली वापरणे, अन्न पुन्हा गरम करणे टाळणे, मेट्रोसारखी सार्वजनिक वाहतूक वापरणे इत्यादी. हा उपक्रम रोटरी आणि महा मेट्रो यांच्यातील सहकार्याचे मूर्त स्वरूप आहे.
प्रांतपाल मराठे यांनी यावर्षीच्या रोटरीच्या कामकाजात पर्यावरण हा केंद्रस्थानी असलेला विषय असल्याचे नमूद केले. १० हून अधिक पर्यावरण संबंधित उपक्रम सध्या सुरु असून, रोटरी ग्रीन वीक हा त्यामधील एक महत्त्वपूर्ण आणि लोकसहभाग वाढवणारा उपक्रम आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून केवळ रोटरी सदस्य नाही, तर संपूर्ण पुणेकर जनतेने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारावी, असा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री शोभा कुलकर्णी यांनी केले.