शबनम न्यूज | प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्तींमध्ये चिकाटी जिद्द व अपार क्षमता असते. अनेक दिव्यांग व्यक्तींनी विविध क्षेत्रात कामगिरी केली आहे. दिव्यांगांना सहानुभूतीची नव्हे तर आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मराठी पत्रकार संघाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर यांनी येथे केले.
दिव्यांग भवन फाउंडेशनच्या वतीने आयोजित पर्पल जल्लोष कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वितरण शुक्रवारी मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सातुर्डेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास दिव्यांग फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी,कार्यक्रम समन्वयक नंदकुमार फुले ब्रह्मदत्त विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब कांबळे स्टॉलधारक प्रतिनिधी ममता वर्मा दिव्यांग भवनचे सल्लागार दत्तात्रय भोसले समुपदेशक दर्शना फडतरे, राजेंद्र वाघचौरे, संगीता जोशी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले की, दिव्यांग व्यक्तींमध्ये चिकाटी आणि जिद्द असते. डॉ. स्टीफन हॉकिंग, दीपा मलिक, सुधा चंद्रन यासारख्या व्यक्तींनी आपल्या मर्यादांवर मात करत जगाला प्रेरणा दिली आहे. पिंपरी चिंचवड मधील अंध असूनही चार्टर्ड अकाउंटंट झालेला भूषण तोष्णीवाल, चळवळीतील कार्यकर्ते मानव कांबळे ही आपल्या शहरातील उदाहरणे आहेत. दिव्यांगांना सहानुभूती नव्हे तर आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ देण्याची गरज आहे असे सातुर्डेकर म्हणाले.
दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख म्हणाले की, जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतील एक टक्का निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत. दिव्यांग फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात स्किल डेव्हलपमेंट कोर्स सुरू करणार असून त्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचे ही आयोजन करण्यात येणार आहे.
दिव्यांग भवन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी म्हणाले की पर्पल जल्लोष च्या माध्यमातून दिव्यांगांना त्यांच्या अंगभूत गुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ तयार केले. भारतभर याचा डंका झाला. पुनम महाले यांनी पर्पल जल्लोष मधील विजेत्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. समुपदेशक तथा कार्यक्रम व्यवस्थापक दर्शना फडतरे यांनी सूत्रसंचालन केले.