शबनम न्यूज | प्रतिनिधी
पती आणि पत्नी या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. भांडण सोडण्यासाठी भावजय गेली होती. त्यावेळी तिच्या कडेवर ११ महिन्यांचं बाळ होतं. त्या भांडणा दरम्यान पत्नीने पतीवर त्रिशूळ फेकून मारले आणि ते त्रिशूळ ११ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यात घुसल्याने बाळाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अवधूत सचिन मेंगावडे (वय ११ महिने) असे मृत्यू झालेल्या बाळाचे नाव आहे. आरोपी पल्लवी नितीन मेंगावडे आणि आरोपी नितीन अजिनाथ मेंगावडे या दोघांना यवत पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील आंबेगाव पुनर्वसन या गावातील आरोपी पल्लवी नितीन मेंगावडे आणि आरोपी नितीन अजिनाथ मेंगावडे या दोघांमध्ये सातत्याने क्षुल्लक कारणावरून भांडणं व्हायची, गुरुवारी देखील त्या पती पत्नीमध्ये भांडण झाली. त्या दोघांची भांडण भावजय भाग्यश्री सचिन मेंगावडे या सोडवायला गेल्या. त्यावेळी त्यांच्या कडेवर ११ महिन्यांचा अवधूत होता.
त्याच दरम्यान आरोपी पत्नी पल्लवी यांनी आरोपी पती नितीन यांना घरात असलेला त्रिशूळ फेकून मारला असता, तो त्रिशूळ भावजय भाग्यश्री यांच्या कडेवर असलेल्या ११ महिन्यांच्या अवधूतच्या डोक्यात घुसला. या घटनेमध्ये अवधूत गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अवधूतला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल केले असता, ११ महिन्यांच्या बाळाची तपासणी केल्यावर डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केले.