शबनम न्यूज | प्रतिनिधी
“उद्योगांना आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देण्यावर भर दिला पाहिजे. रोजगाराभिमुख व कौशल्याधारित शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था व उद्योग यांच्यात परस्पर समन्वय वाढण्याची गरज असून, नवीन शिक्षण धोरणात या गोष्टीला अधिक प्राधान्य दिले आहे,” असे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
जॉबिझा मल्टिपल सर्व्हिसेसच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र एज्युकेशन अँड कॉर्पोरेट आयकॉन्स २०२५’ सन्मान सोहळ्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. सनीज् वर्ल्ड येथे आयोजित सोहळ्यात ‘जॉबिझा’चे संस्थापक गौरव शर्मा, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, माजी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, माजी संचालक डॉ. विश्वास गायकवाड, असेंचर टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत सारडा, टेराडाटाचे वरिष्ठ व्यवस्थापक कौस्तुभ कुलकर्णी, फोक्सवॅगन स्कोडाचे सरव्यवस्थापक अजित कवडे, सिम्प्लिफाय हेल्थकेअरचे वरिष्ठ संचालक संगीता सिंग, आयडॉक्स पीएलसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास मसेकर, आय-सोर्स इन्फोसिस्टीम्सचे संस्थापक जितेंद्र सरदेसाई आदींना सन्मानित करण्यात आले. सॉफ्टलिंक ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माहेश्वरी यांचे ‘परिवर्तनशील शिक्षण व भविष्यातील कॉर्पोरेट कार्यपद्धती’ यावर बीजभाषण झाले.
इनोव्हेशन आणि मानवी विकासात परिवर्तनशील योगदान देणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ‘शिक्षण’ विभागातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या, महिला शिक्षणात कार्य करणाऱ्या, शिक्षण व उद्योग यांच्यातील परस्पर संबंध दृढ करणाऱ्या, दूरदृष्टीने व प्रेरक शिक्षण देणाऱ्या, तंत्र शिक्षणात भर घालणाऱ्या, शिक्षण क्षेत्रात इनोव्हेशन व मूल्यांकनासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वाचा, तसेच ‘कॉर्पोरेट’ विभागातून ‘आयकॉनिक एचआर लीडर’, ‘बेस्ट आंत्रप्रेन्युअर’, ‘बेस्ट इन लर्निंग अँड डेव्हलपमेंट’, ‘एचआर लीडरशिप अँड डायव्हर्सिटी चॅम्पियन’, ‘यंग एचआर लीडर अँड ट्रेलब्लेझर’, ‘बेस्ट इन टॅलेंट मॅनेजमेंट’ असे पुरस्कार देण्यात आले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “उद्योग व शिक्षण क्षेत्रातील गुणवंतांना एकाच व्यासपीठावर आणून सन्मानित करण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. यातून दोन्ही क्षेत्रांना आवश्यक गोष्टींची, कौशल्यांची देवाणघेवाण होईल. त्यातून विद्यार्थ्यांना भविष्याच्या दृष्टीकोनातून चांगले, रोजगारक्षम व कौशल्याचे, तसेच प्रात्यक्षिक शिक्षणाचे धडे मिळतील. सर्व पुरस्कारार्थींचे योगदान दोन्ही क्षेत्रांच्या प्रगतीसाठी मोलाचे आहे.”
गौरव शर्मा यांनी स्वागत-प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. “शिक्षण आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील विकासाला दिशा देणाऱ्या परिवर्तनशील विचारवंतांची ओळख करून देणे, हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हे व्यासपीठ म्हणजे दूरदृष्टी, परिणामकारकता आणि नेतृत्व यांचा संगम आहे,” असे शर्मा यांनी नमूद केले.