शबनम न्यूज | प्रतिनिधी
देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक लोकसभेच्या अध्यक्षांनीही ‘भारतामधील सर्वोत्तम स्पीकर्सपैकी एक’ असे केले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
कफ परेड फेडरेशनच्या वतीने कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांच्या विशेष सत्कार समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव आश्विनी भिडे, मुंबई महानगर विकास प्राधिकरणचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विधानसभा ही देशातील सर्वाधिक दिवस चालणारी, सर्वाधिक चर्चासत्र घेणारी व कार्यक्षम विधानसभा असल्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत चालणाऱ्या कामकाजामुळे सदस्यांना सातत्याने गती आणि गुणवत्ता राखावी लागते आणि त्यामुळे सामान्य माणसांचे प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडले जातात.
ॲड. राहुल नार्वेकर यांचा मतदारसंघ कुलाबा-कफ परेड परिसर हा राज्याच्या राजधानी क्षेत्रात येतो. हा परिसर ‘स्टेट कॅपिटल रिजन’ म्हणून मान्यता मिळावी, यासाठी नार्वेकर यांनी सातत्याने प्रयत्न केले. या भागातील फ्लोटिंग पॉप्युलेशनसाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा उभारण्याचे काम त्यांनी पुढाकाराने सुरू केले आहे.
विधानभवनाचा चेहरा बदलण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचेही कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विधानभवन आज वैशिष्ट्यपूर्ण आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून कामकाज कागदविरहित करण्याचा निर्णय त्यांच्यामुळेच झाला आहे. तसेच, महाराष्ट्र हे आता देशातील नवे स्टार्टअप हब बनले असून, केंद्र सरकारच्या स्टार्टअप इंडिया 2025 अहवालानुसार, गुंतवणूक व स्टार्टअप संख्येनुसार महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. आज मुंबई-एमएमआर रिजन हा देशातील नवा डेटा सेंटर हब झाला आहे.
अटल सेतू, मरीन ड्राइव्हपर्यंतचा ऑरेंज गेट टनेल, कोस्टल रोड व सी-लिंकचे प्रकल्प यामुळे शहरातील ट्रॅफिकची समस्या सुटेल. बस, मेट्रो, मोनो रेल आदी सार्वजनिक वाहतुकीसाठी सिंगल तिकीट प्रणालीचे काम सुरु असून एमएमआर क्षेत्रातील नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीने एकाच तिकीटावर प्रवास करणे शक्य होणार आहे.