शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील अनाधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करण्यात यावी. फुटपाथवर अतिक्रमण होणार नाही, यासाठी पथकांची नियुक्ती करा. कारवाईमध्ये सातत्य ठेवा, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणविरोधी मोहिमेचा आढावा आज आयुक्त सिंह यांनी घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह आयुक्त मनोज लोणकर, उपायुक्त राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त किरणकुमार मोरे, अमित पंडित, अतुल पाटील, निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी किशोर ननवरे, कार्यकारी अधिकारी लक्ष्मीकांत कोल्हे, विजय सोनवणे, प्रभारी कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, उपअभियंता किरण माने उपस्थित होते.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, सध्या शहरात सुरू असलेली सर्व प्रकारची अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करण्यात यावी. नियमातील तरतुदीनुसार अशा बांधकामांवर कारवाई करण्यापूर्वी २४ तास अगोदर नोटीस द्या. शहरातील रस्त्यालगतच्या फुटपाथवर होणारे अतिक्रमण काढण्यात यावे. सर्व प्रभाग अधिकारी व बीट निरीक्षकांनी सतर्क राहावे. कारवाईमध्ये टाळाटाळ करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल. महापालिका हद्दीत अनियमित बांधकामे व अतिक्रमण यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वतंत्र दक्षता पथक सक्रिय करण्यात आले आहे. या पथकाकडून मिळालेल्या अहवालाच्या आधारे संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील कोणत्या प्रभागात अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामाची समस्या जास्त आहे, ही समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजना सुरू आहेत, यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. अनधिकृत बांधकामे, पदपथ व नाल्यावर झालेले अतिक्रमण, परवानगीविना सुरू असलेल्या आठवडे बाजार याचाही आढावा बैठकीत आयुक्त सिंह यांनी घेतला.
अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासोबतच अशा प्रकारची बांधकामे होणार नाहीत, यासाठी विशेष काळजी घ्यावी. अतिक्रमण, अनाधिकृत बांधकामाची समस्या सोडवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यासोबतच फिल्डवर असणाऱ्या अधिकाऱ्यांनी सातत्याने निरीक्षण करून तात्काळ पावले उचलावीत.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
बांधकाम परवानगी व अतिक्रमण विभाग यांच्यात समन्वय अधिक मजबूत केला जात आहे. अनाधिकृत बांधकामांना सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी दक्षता पथके शिफ्टमध्ये कार्यरत असतील. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे.– मनोज लोणकर, सह आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका