शबनम न्यूज | प्रतिनिधी
मारुंजी येथील लाईफ रिपब्लिक टाऊनशीप सोसायटी आणि जांभे गावात मागील चार दिवसात केवळ चारच तास वीज पुरवठा असल्याने परिसरातील नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. ‘महावितरण’ने तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर पोस्ट करून केले आहे.
“मारुंजी येथील लाईफ रिपब्लिक टाऊनशीप सोसायटीसह परिसरातील अनेक ठिकाणी अद्याप देखील वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. गेली कित्येक तास वीज नसल्याने नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणने तांत्रिक अडचणी दूर करून लवकरात लवकर या भागातील वीजपुरवठा सुरळीत करावा,” असे खासदार सुळे यांनी पोस्ट केले आहे.
‘महापारेषण’ कंपनीने नियोजित देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (६ जुलै) सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत वीजपुरवठा बंद केला होता. मात्र, देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरू करताना ‘इन्फोसिस ते पेगासस’ या भूमिगत वीज वाहिनीत दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोठा बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या हिंजवडी, एमआयडीसी आणि आयटी पार्क परिसरातील ९१ उच्चदाब व सुमारे ५२ हजार लघुदाब वीजग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यात पिंपरी विभागातील २० हजार, तर मुळशी विभागातील ३२ हजार घरगुती, लघुदाब ग्राहकांना फटका बसला. मात्र, घरगुती ग्राहकांना पर्यायी मार्गाने, तर काही आयटी उद्योगांना चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली होती.