शहरात उद्योग मित्र कार्यालय शाखा चालू करावी – अभय भोर
शबनम न्यूज | प्रतिनिधी
जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी शर्मा यांना इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आज पिंपरी चिंचवड शहरात उद्योग मित्र कार्यालय शाखा चालू करावी आणि एमआयडीसी परिसरातील समस्यांकडे पुण्या ऐवजी पिंपरी चिंचवड शहरात बैठका घ्याव्यात, असे निवेदन दिले. उद्योग धंदे पिंपरी-चिंचवडमध्ये… पण निर्णय घेणाऱ्या बैठका पुण्यात? लघु उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी! पिंपरी चिंचवड शहरात उद्योग मित्र कार्यालय उभे करण्याची मागणी जुनीच आहे परंतु अजूनही त्यावर कोणताही शासकीय निर्णय घेण्यात आला नसल्याचे अभय भोर यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड परिसरात हजारो लघु व मध्यम उद्योग धंदे कार्यरत असूनही, महत्वाच्या बैठका, धोरणे व निर्णय प्रक्रियेची केंद्रे पुण्यात ठेवली जात आहेत. लघुउद्योगांसाठी असणाऱ्या योजना महिला उद्योगासाठी असणाऱ्या योजना या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही फक्त कागदी घोडे नाचविण्याचे काम उद्योग विभागाकडून केले जात असल्याचं दिसून येते.
“ज्या शहरात उद्योजकांची खरी कोंडी आहे, तिथेच त्यांना बोलावण्याऐवजी पुण्यात बसून निर्णय घेणे म्हणजे लघु उद्योजकांच्या प्रश्नांना केलेला दुजाभाव आहे,” असा घणाघात उद्योग जगतातून होत आहे. पुण्यात बैठकी म्हणजे हा फक्त देखावा असून उद्योग क्षेत्रासाठी आम्ही फार मोठे कार्य करत असल्याचा देखावा साजरा करण्यात येतो परंतु मूळ उद्योजकांचे प्रश्न मार्गी लागत नाहीत या बैठकांना पुरस्कार सोहळा असे नवीन रूप देण्यात आलेले आहे.
हे धोरण म्हणजे फक्त मोठ्या उद्योगांच्या हितसंबंधांची जोपासना असून, पिंपरी-चिंचवडमधील लघु उद्योजकांची अडचण, मागण्या आणि वास्तविक स्थिती याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे.
फक्त पुण्यात बैठकांचे आयोजन करून लघु उद्योजकांना निर्णयप्रक्रियेतून दूर ठेवणे, हे पूर्णपणे अन्यायकारक असून, याविरोधात आता फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून लवकरात लवकर शासनाने यावर विचार करावा, असे प्रसिद्धी पत्राद्वारे अभय भोर यांनी सांगितले.