शबनम न्यूज | प्रतिनिधी
डेक्कन जिमखाना भागातील भुयारी मार्गाच्या कठड्यावर भरधाव दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. कठड्यावर आदळल्यानंतर दुचाकीस्वार तरुण थेट भुयारी मार्गात कोसळला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. धवल नारखेडे (वय २२, रा. द्वारिकानगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार धवल हा सोमवारी (७ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव वेगात डेक्कन जिमखाना भागातून निघाला होता. गरवारे भुयारी मार्गावरील छोट्या पुलाच्या कठड्यावर भरधाव दुचाकी आदळली. त्यानंतर त्याचे नियंत्रण सुटले आणि तो दुचाकीसह भुयारी मार्गात कोसळला. अपघातात धवलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
धवलची बहीण पिंपरीत राहायला आहे. तो पुण्यात नोकरीच्या शोधात होता. त्याला एका खासगी ठिकाणी नोकरी मिळाली होती. कामाला जात असताना ही दुर्घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या धवल याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हवलादर बोराटे तपास करत आहेत.