शबनम न्यूज | प्रतिनिधी
महात्मा फुले नगर येथील झोपडपट्टीचे पुनर्वसन मागील वर्षापासून सुरू करण्यात आले आहे. तेथील १५०० पैकी १३०० झोपड्या अद्याप पर्यंत तिथेच आहेत. या झोपड्या आणखी अडीच वर्ष तिथेच राहणार असून या झोपडीधारकांना नागरी सुविधा द्याव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंघटित विभागाचे शहराध्यक्ष रवींद्र ओव्हाळ यांनी फेब्रुवारी महिन्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. जनसंवाद सभेत देखील याविषयी मागणी करण्यात आली होती. एखाद्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या मूळ जागी असणाऱ्या उर्वरित झोपडीधारकांना नागरी सुविधा पुरविणे विषयी विकसक आणि झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभाग यांच्यामध्ये मतभेद होते. त्यामुळे येथील १३०० झोपडीधारकांना नागरी सुविधा मिळत नव्हत्या. शहरातील विविध माध्यमांनी देखील याविषयीचा पाठपुरावा केला होता.
अखेर मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड मनपाच्या “झोनीपु” विभागाने महात्मा फुले नगर झोपडपट्टीत रस्ता, पाणी, स्वच्छता व मल निसारण वाहिनी या नागरी सुविधा पुरविल्या आहेत. त्याबद्दल रवींद्र ओव्हाळ व महात्मा फुले नगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी मनपाचे आभार मानले आहेत. तसेच येथे आता लवकरात लवकर पथदिवे तसेच अंतर्गत भागात विजेचे दिवे लावून रहिवाशांना दिलासा द्यावा अशी ही मागणी रवींद्र ओव्हाळ यांनी केली आहे.