spot_img
spot_img
spot_img

भक्तीच्या पावसात न्हालेली ग्रीन्स सोसायटीची दिंडी!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 थेरगाव, चिंचवड येथील ग्रीन्स सोसायटीत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात रविवार, दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी साजरा झाला. पारंपरिक टाळ, मृदंग आणि अभंगगायनाच्या गजरात, संपूर्ण सोसायटीत दिंडी काढण्यात आली.

दिंडीच्या तयारीची सुरुवात श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा सुरू झाल्या दिवशीपासूनच झाली. त्यानंतर रोज सोसायटीतील ज्येष्ठ महिलांनी हरिनामाचा गजर केला, आणि संपूर्ण परिसर पांडुरंगमय झाला होता.

आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी प्रथम विठ्ठल-रुक्मिणी पूजन आणि त्यानंतर पालखी पूजन, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर झामाबाई बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. अनिल बारणे यांनीही उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली.

दिंडीत लहानग्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशात सादर केलेल्या गोड नृत्याने सर्वांची मने जिंकली. महिलांनी टाळांच्या गजरात भजने सादर केली, ज्याला मृदंग आणि शृंगवाद्यांची साथ लाभली. वारकरी पोशाखात सज्ज झालेले आजी-आजोबा, रंगीबेरंगी पताका, पाऊस पडत असतानाही परिसरात फिरणारी दिंडी, आणि ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण सोसायटी दुमदुमून गेली.

एकंदरीत, आषाढी एकादशीचा हा उत्सव भक्ती, प्रेम, एकता आणि संस्कृतीचा मनाला भिडणारा अनुभव ठरला. या सोहळ्यातून मिळालेली सकारात्मक ऊर्जा संपूर्ण वर्षभर साथ देईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!