-
मराठी भाषेला हात लावून दाखवा ; राज ठाकरे यांचे आव्हान
शबनम न्यूज | प्रतिनिधी
आज शिवसेना (ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विजयी मेळाव्याचे आयोजन वरळीतील (मुंबई) एनएससीआय डोम येथे करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केले. तसेच जे बाळासाहेबांना जमले नाही ते फडणवीसांनी करून दाखवले, असे म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची जोरदार सुरुवात केली.
राज ठाकरे म्हणाले की, आम्हा दोघा भावांना एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवलं. हिंदी सक्तीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले, कुणालाही न विचारता हिंदी सक्ती कशासाठी? तुमच्याकडे सत्ता आहे म्हणून का? तुमची सत्ता विधानभवनात. इथं रस्त्यावर आमची सत्ता आहे, असे राज ठाकरे यांनी सुनावलं. हिंदी बोलणारे राज्य मागास आहेत आणि हिंदी न बोलणारे राज्य प्रगत आहेत. मग आम्ही हिंदी शिकून असा काय विकास होणार आहे? मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी आधी भाषेला हात घातला. यांनी चाचपडून पाहिले. पण विरोध झाल्यानंतर मागे हटले. परत मराठी भाषेला हात लावून दाखवा असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले.
पुढे ते म्हणाले, आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकत आहेत, असा युक्तिवाद सत्ताधारी करत आहेत. त्यांच्या या दाव्याला काही अर्थ नाही. बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले, पण त्यांच्या मराठी अभिमानाद्दल कुणाला संशय आहे का? तसेच लालकृष्ण आडवाणी मिशनरी हायस्कूलमध्ये शिकले. त्यांच्या हिंदुत्वाबद्दल कुणाला शंका आहे का? असे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठी म्हणून तुम्ही लोक एकत्र आल्यानंतर तुम्हाला जातीमध्ये विभागले जाईल, असे राज ठाकरे यांनी म्हटले.