शबनम न्यूज | प्रतिनिधी
बेलसर (ता. पुरंदर) येथील एक बंद घराचा दरवाजा कोयंडे तोडून चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने सुमारे १८ तोळ्यांहून अधिक सोने, ७० हजार रुपये रोख चोरी केले आहेत. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
फिर्यादी संजय गरुड सध्या तुकाई दर्शन, हडपसर येथे राहतात, तर त्यांचे आई-वडील बेलसर येथे वास्तव्य करतात. जून महिन्याच्या १८ तारखेला संजय गरुड आपल्या आई-वडिलांना घेऊन हडपसर येथील दवाखान्यात गेले होते. परंतु, २७ जून रोजी त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांकडून त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती मिळाली. तत्काळ ते बेलसर येथे आले असता चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे की, चोरीची घटना १८ जून ते २६ जून दरम्यान घडली आहे.
चोरट्यांनी खालील सोन्याच्या वस्तू चोरी केल्या आहेतः ३ तोळ्यांचे सोन्याचे गंठण, ३ तोळ्यांचे काळे मणी असलेले गंठण, ५ तोळ्यांचा बकुळी हार, १.५ तोळ्याची ठुशी, १.८ तोळ्याचा सोन्याचा हार, ५.५ ग्रॅम कर्णफुले, प्रत्येकी १ तोळ्याच्या तीन अंगठ्या, १ ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी, तसेच १ तोळ्याचे कानातले झुबे. या सर्व वस्तू मिळून १८ तोळ्यांपेक्षा जास्त वजनाच्या सोन्याच्या आहेत. तसेच कपाटातील रोख रक्कम ७० हजार रुपये सुद्धा चोरीस गेली आहे. जेजुरी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नामदेव तारडे करीत आहेत.