शबनम न्यूज | प्रतिनिधी
सोन्याची साखळी चोरल्याच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना निघोजे (ता. खेड, जि. पुणे) येथे गुरुवारी (दि. ३) रात्री ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काशीनाथ रंगनाथ भक्त (२५, रा. मारुती मंदिरासमोर, निघोजे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी दर्शन लक्ष्मण शिंदे (रा. भैरवनाथ मंदिराजवळ, निघोजे) आणि चैतन्य ज्ञानेश्वर येळवंडे (रा. सरकारी हॉस्पिटलच्या मागे, निघोजे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. गणेश बेंडाले याने दर्शन शिंदे यास सोन्याची चेन घालण्यासाठी दिली होती. ही चेन चोरल्याच्या संशयावरून काशीनाथ यांना दर्शन शिंदे याने आपल्या गाडीच्या डिक्कीतून लाकडी बांबू काढून बेदम मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. यावेळी काशीनाथ यांना सोडवण्यासाठी आलेल्या रितेश सोनवणे यांच्यावरही दर्शन शिंदे व चैतन्य येळवंडे यांनी लाकडी बांबू उगारून शिवीगाळ आणि दमदाटी केली. या घटनेनंतर काशीनाथ यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.