शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय महाराष्ट्र’ ऐवजी ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिली. ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) परिसरातील त्रिशक्ती गेट येथे उभारण्यात आलेल्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (नि.) भूषण गोखले, लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल धीरज शेठ, एनडीएचे कमांडंट व्हाईस ॲडमिरल गुरचरण सिंग, खासदार मेधा कुलकर्णी, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे सचिव कुंदनकुमार साठे आदी उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात अशी घोषणा दिल्यानंतर यावर आता राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील “विना शकले, विपरीत बुद्धी” असे उच्चार यावेळी केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की, आता हिंदी नंतर गुजराती भाषा महाराष्ट्रात येणार आहे का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्याच प्रमाणात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.