शबनम न्यूज | प्रतिनिधी
विविध भारती म्युझिकल इव्हेंट प्रस्तुत ‘प्यार जिंदगी हैं…’ या सुमधुर हिंदी – मराठी सुरेल गीतांच्या ऑडिओ – व्हिज्युअल नि:शुल्क सांगीतिक मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात (छोटे सभागृह) गुरुवार, दिनांक ०३ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सांगीतिक मैफलीत डाॅ. किशोर वराडे, दिलीप तापकीर, विलास गाधडे, महिपत वरपे, विजय सहारे, श्रुती सरमाने, जवाहर व्यास, सुवर्णा जोशी, नरेंद्र जोशी, कुमार भालेराव, सुनंदा भालेराव, अंजली दंडवते, संजय उरणकर, शिरीष भागवत, सुहास पालेकर, शैलजा पालेकर, सुभाष बोरोले, प्राप्ती बोरोले, उज्ज्वला केळकर, सोनाक्षी बांबुरडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ईशस्तवनानंतर कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विनायक कदम, नंदकुमार कांबळे, नेहा दंडवते, स्वाती भागवत, डॉ. सायली बांबुरडे, शुभांगी पवार, रजनी यावलकर, स्मिता उरणकर, अनिल जंगम, सतीश कापडी, विलास खरे, अरुण सरमाने या गायक कलाकारांनी आपल्या एकल आणि युगुलस्वरातील सादरीकरणातून चित्रपटसंगीतातील लोकप्रिय आणि अभिजात सुमधुर गीतांचा नजराणा पेश करीत रसिकांची मने जिंकून घेतली. त्यामध्ये मैफलीत ‘मैं जट यमला पगला दिवाना…’ , ‘ये दिल मुझे बता दे…’ , ‘घडी घडी मेरा दिल धडके…’ , ‘दिल हूम हूम करे…’ , ‘हमदम मेरे मान भी जाओ…’ , ‘मेरी भिगी भिगी सी…’ , ‘तेरा मेरा प्यार अमर…’ , ‘मुझे रंग दे…’ या एकल स्वरातील बहारदार गीतांनी श्रोत्यांना प्रेमरंगाच्या विविध छटांनी रंगवून टाकले; आणि त्यातच ‘भातुकलीच्या खेळामधली…’ या मराठीतील उत्कट भावगीताने वन्स मोअर घेत त्याचे गारुड अजूनही कायम असल्याचे सिद्ध केले. तरुणाईचा आवडता गायक कुमार शानू आणि चिरतरुण गायिका आशा भोसले यांच्या गीतांची मालिका हे मैफलीचे खास आकर्षण ठरले.
‘तुम पास आये…’ , ‘दिल तो पागल हैं…’ , ‘धिरे धिरे बोल कोई…’ , ‘सुन बेलिया…’ , ‘कोयल बोली दुनिया डोली…’ , ‘कहो ना प्यार हैं…’ , ‘दिल की ये आरजू थी…’ , ‘शोला जो भडके…’ , ‘तुम क्या मिले…’ , ‘मदहोश दिल की धडकन…’ , ‘मनवा लागे रे…’ , ‘हम को हमी से…’ , ‘आजा पिया तोहे प्यार दूं…’ या युगुलस्वरातील शृंगारिक गीतांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विनोद खन्ना यांच्या चित्रपटातील लोकप्रिय संवादांसह ‘प्यार जिंदगी हैं…’ या मैफलीच्या शीर्षकगीताच्या समरसून केलेल्या सादरीकरणाने अन् श्रोत्यांनी वन्स मोअरचा जल्लोष करीत त्याला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मैफल खऱ्या अर्थाने रंगतदार झाली.
कार्यक्रमादरम्यान ‘डाॅक्टर्स डे’चे औचित्य साधून डाॅ. किशोर वराडे आणि डाॅ. सायली बांबुरडे तसेच जन्मदिनानिमित्त अनिल जंगम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ‘हमको तुमसे हो गया हैं प्यार…’ या प्रणयगीताने रंगलेल्या मैफलीचा समारोप करण्यात आला. विनायक कदम यांनी संयोजन केले; कार्यक्रमाची संकल्पना नंदकुमार कांबळे यांची होती. सचिन शेटे यांनी विशेष साहाय्य केले. गदिमा नाट्यगृहाचे व्यवस्थापक राकेश सौदे यांनी नियोजनात सहकार्य केले. शैलेश घावटे यांनी ध्वनिसंयोजन केले. सौमिल घावटे यांनी दृकश्राव्यचित्रण आणि छायाचित्रण केले. आकाश गाजूल यांनी फोटोग्राफी केली. दृश्यनिर्मिती विक्रम क्रिएशनच्या साहाय्याने करण्यात आली. अरुण सरमाने आणि स्वाती भागवत यांनी खुसखुशीत शैलीतून निवेदन केले.