शबनम न्यूज | प्रतिनिधी
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वात थरारक आणि साहसी कात्रज ते सिंहगड (K2S) ‘मान्सून ऍडव्हेंचर रेस’ ही स्पर्धा येत्या २६ जुलै २०२५ रोजी होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन गिरीप्रेमी संस्थेचे प्रमुख उमेश झिरपे, बांदल ग्रुपचे निलेश बांदल यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा पुणेकरांना थरारक, साहसी आणि ऊर्जादायी अनुभव घेता येणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक व लाईफ फिट अरेनाचे संचालक महेंद्र लोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी स्पर्धेच्या कोअर टीमचे सदस्य राजू लोकरे व विजय नांदगावकर उपस्थित होते.
महेंद्र लोकरे म्हणाले, “कात्रज ते सिंहगड मॉन्सून ॲडव्हेंचर रेस २.० ही अनोखी स्पर्धा कात्रज बोगद्याच्या टोकापासून सिंहगड किल्ल्याच्या पायथ्यापर्यंतच्या १३ डोंगरांमधून २१ किमीचा प्रवास करते. ही स्पर्धा केवळ धावण्यासाठी नाही, तर सहनशक्ती, इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाची खरी परीक्षा पाहणारी आहे. ‘K2S ट्रेलब्लेझर’ ही स्पर्धात्मक २१ किलोमीटर व ‘K2S अॅडव्हेंचर रन’ ही ७ किलोमीटर अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२५ अशी आहे.”
स्पर्धात्मक गटासाठी असलेल्या ‘K2S ट्रेलब्लेझर’ची सुरुवात सकाळी ७ वाजता कात्रज जुन्या बोगद्यापासून होणार असून, सिंहगड किल्ला पायथ्यापर्यंत सात तासांत ही स्पर्धा पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. ‘K2S अॅडव्हेंचर रन’ची सुरुवात सकाळी ८ वाजता होणार असून, यामध्ये चालण्यासह पळता किंवा ट्रेक करता येणार आहे. सर्व वयोगटात आकर्षक व रोख बक्षिसे दिली जाणार असून, सहभागी होणाऱ्या प्रत्येकास टाइमिंग बिब, ड्राय फिट टी-शर्ट, फिनिशर मेडल, रेसनंतर नाश्ता, वैद्यकीय आपत्कालीन सेवा, माउंटन रेस्क्यू व स्वयंसेवक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. २१ किमी स्पर्धात्मक गटासाठी १८ ते ३५ वर्षे – पुरुष/महिला (ओपन श्रेणी), ३६ ते ४५ वर्षे – पुरुष/महिला, ४६ वर्षे व त्यापेक्षा अधिक – पुरुष/महिला (व्हेटरन कॅटेगरी) पात्र असणार आहेत. स्पर्धकांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था केली आहे, असेही लोकरे यांनी नमूद केले.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तसेच अधिक माहितीसाठी ८०८७ ६०८३२६, ९८५०८१४८५७ यावर किंवा [email protected] या ईमेल वर संपर्क साधावा. नोंदणी करताना ‘READERS20’ हा कोड वापरून सवलत घेता येईल. या पावसाळ्यात सहनशक्ती, थरार आणि निसर्ग यांचा मिलाफ अनुभवण्यासाठी, स्वतःला आव्हान देऊन मर्यादा ओलांडून निसर्गाच्या कुशीत अविस्मरणीय प्रवासाची अनुभूती घेण्यासाठी अधिकाधिक लोकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महेंद्र लोकरे यांनी केले आहे.