शबनम न्यूज | प्रतिनिधी
“महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात भर घालण्याचे काम दिवाळी अंकांनी केले आहे. मन आणि मेंदूला बौद्धिक फराळ देऊन मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी दिवाळी अंक उपयुक्त ठरतात. खऱ्या अर्थाने दिवाळी अंक म्हणजे मराठी संस्कृतीचा अविभाग्य घटक आहे,” असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
दिनमार्क पब्लिकेशनच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात आयोजित स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, साहित्यिक व परीक्षक माधव राजगुरू, संयोजक दिनकर शिलेदार आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन येत्या शुक्रवारपर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, “संत ज्ञानेश्वर महाराजांनीही दिवाळीतील अक्षर फराळाचा उल्लेख करताना ज्ञानाची दिवाळी, असे म्हटले आहे. महाराष्ट्रातील दिवाळी अंकांना शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. मध्यमवर्गीय माणसाने दिवाळी अंकांना जीवित ठेवण्याचे काम केले. स्पर्धेच्या काळात काही अंक अल्पायुषी ठरले, तर काहींनी तग धरून हा वारसा जपला. दिवाळी अंकांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत गेले. आजघडीला चारशेहून अधिक अंक प्रकाशित होतात. ज्ञान आणि मनोरंजनाचे ध्येय गाठताना अप्रतिम मुखपृष्ठ, चित्रे, आशय संपन्नता, विषयांतील वैविध्यता मराठी वाचकांना समृद्ध करणारी आहे. एवढेच नाही, तर दिवाळी अंकांनी अनेक लेखक, साहित्यिक घडवले आहेत.”
भारत सासणे म्हणाले, “दिवाळी अंकांची ही परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली असून, मराठी व बंगाली भाषेत विशेष अंक निघतात. अनेक आव्हानावर मात करून ही परंपरा जाणार्या संपादकांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे. अंकांची संख्या वाढतेय, याचा आनंद आहे.”
माधव राजगुरू म्हणाले की, अडीचशे तीनशे अंक वाचून समृद्ध झालो. वैविध्यपूर्ण आशय, मांडणी, संकल्पना अशा विविधतेने नटलेले हे अंक आहेत. ही स्पर्धा लेखकांना घडविणारी आहे. विविध प्रांतातील, भाषेतील, समाजातील हे अंक भारावून टाकणारे आहेत.”
प्रास्ताविकात दिनकर शिलेदार म्हणाले, “या प्रदर्शनात २३५ दिवाळी अंक आहेत. वैविध्यपूर्ण दिवाळी अंकांचे सादरीकरण एकाच छताखाली व्हावे, या उद्देशाने हे प्रदर्शन महत्त्वपूर्ण आहे. दिवाळी अंकांची यशस्वी परंपरा जपण्यासह त्यांना प्रोत्साहन देणारे हे प्रदर्शन आहे.” अन्वय बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.