शबनम न्यूज | प्रतिनिधी
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर एका प्रवाशाला धमकावून लुटणाऱ्या मोटारचालकासह साथीदाराला सिंहगड रस्ता पोलिसांनी गजाआड केले. चोरट्यांकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार आणि मोबाइल संच असा चार लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निखील अरविंद पवार (वय २७, रा. मातोश्रीनगर, आंबेगाव बुद्रुक, कात्रज), रोहन शाम पवार (वय २७, रा. नऱ्हे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसा, ३० मे रोजी रात्री तक्रारदार तरुण मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर बसची वाट पाहत थांबला होता. तो कोल्हापूरला निघाला होता. त्या वेळी आरोपी पवार हे मोटारीतून तेथे आले. त्यांनी तरुणाला काेल्हापूरला सोडतो, अशी बतावणी केली. त्यानंतर धावत्या मोटारीत पवार आणि साथीदारांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखविला.तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील रोकड, मोबाइल संच, सोनसाखळी असा मुद्देमाल लुटून आरोपी पवार पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते.
प्रवासी तरुणाला लुटणारा चोरटा नऱ्हे भागातील भूमकर चौकात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी देवा चव्हाण, सागर शेडगे, निलेश भोरडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी निखील पवारला सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीत साथीदार रोहन पवार याचे नाव समजले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, संजय शिंदे, उत्तम तारू, अण्णा केकाण, विकास बांदल, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतीश मोरे, संदीप कांबळे, तानाजी सागर, समीर माळवदकर, शिरीष गावडे यांनी ही कारवाई केली.