शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यालय अधीक्षक प्रमोद श्रीकृष्ण सावरकर ३० जून २०२५ रोजी सुमारे ३६ वर्षांच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेनंतर निवृत्त झाले. या कालावधीत महापालिकेतील जवळपास सर्वच महत्त्वाच्या विभागांमध्ये त्यांनी काम केले. निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या वर्षात ते चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते.
सांस्कृतिक जाण व या क्षेत्राची पुरेशी माहिती असल्यामुळे वर्षभरात त्यांनी या ठिकाणी उत्तम कामकाज केले. या एका वर्षात नाट्यगृहात ६१५ कार्यक्रम पार पडले, त्यात १५५ नाटकेच होती. नामवंत कलावंतांची अधिकाधिक नाटके तसेच उत्तमातील उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यगृहात व्हावेत, यासाठी त्यांनी कायम सकारात्मक भूमिका ठेवली. केवळ नाट्यगृहाच्या माध्यमातून वर्षभरात एक कोटी रूपये उत्पन्न महापालिकेला मिळाले. बराच काळ शासनाकडे थकित असलेली २५ लाखांची रक्कम त्यांनी पाठपुरावा करून पालिकेला मिळवून दिली.
दिशा सोशल फाऊंडेशन असो किंवा शहरातील विविध संस्थांना कार्यक्रमांसाठी सर्वतोपरी मदत करण्याची भूमिकाच त्यांनी ठेवली. याची जाण ठेवून सावरकर यांचा मंगळवारी (१ जुलै) दिशा सोशल फाऊंडेशनतर्फे शिवप्रतिमा व पुस्तके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. माजी अध्यक्ष गोरख भालेकर, नाना शिवले, कार्याध्यक्ष राजेंद्र करपे, उपाध्यक्ष संतोष बाबर, सचिन साठे, राजेश सावंत, नंदकुमार कांबळे, संतोष निंबाळकर, शरीफ शेख यावेळी उपस्थित होते.