spot_img
spot_img
spot_img

राज्यात उष्माघाताच्या धोक्यात वाढ!

शबनम न्यूज | पुणे

राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने उष्णतेशी निगडित आजारांचा धोका वाढू लागला आहे. राज्यात उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ सुरूच असून, आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे.

राज्यात २१ मार्चपर्यंत उष्माघाताचे २१ रुग्ण आढळून आले असून, त्यात गडचिरोलीत सर्वाधिक ४ रुग्ण असून त्याखालोखाल बुलढाणा, नागपूर प्रत्येकी ३ रुग्ण, पालघर, लातूर प्रत्येकी २ रुग्ण, नांदेड, नाशिक, धाराशिव, रायगड, सांगली, वर्धा आणि ठाणे प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. राज्यात उन्हाचा पारा वाढला आहे. उन्हाळ्यामुळे तापमान वाढल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. उष्णता जास्त वाढल्याने उष्माघातासह आरोग्यविषयक इतर समस्या निर्माण होत आहेत.

उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती, स्तनदा माता, शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्ती, सहव्याधीग्रस्त अशांना होतो. त्यामुळे त्यांनी उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी. लहान मुले आणि वृद्धांना पुरेसे पाणी पिण्यास द्या. गर्भवतींनी उन्हात जाणे टाळावे आणि हलका आहार घ्यावा. उन्हात काम करणाऱ्यांनी अधूनमधून विश्रांती घ्यावी. जास्त घाम येत असेल तरी ओआरएस, साखर-मीठ पाणी किंवा ताक प्यावे. आजारी व्यक्तींना या काळात अधिक त्रास होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी आणि गरज भासल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!