spot_img
spot_img
spot_img

कोरियन भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांना असंख्य संधींची दारे उघडतील

दक्षिण कोरियाचे मुख्य वाणिज्यदूत यू डोंग-वान यांचे प्रतिपादन; इंडो-कोरियन सेंटरतर्फे कोरियन भाषा वक्तृत्व स्पर्धा
शबनम न्यूज | प्रतिनिधी
“कोरियन भाषा शिकल्याने भारतीय विद्यार्थ्यांना संधींची असंख्य दारे उघडतील. भारतातील विविध भागांमध्ये असे कोरियन भाषा शिकण्यासंदर्भातील उपक्रम दोन्ही संस्कृतींना एकत्र आणतील. तसेच भारतीय विद्यार्थ्यांना कोरिया-आधारित कंपन्यांमध्ये अनेक संधी मिळवून देतील,” असे प्रतिपादन दक्षिण कोरियाचे मुंबईतील मुख्य वाणिज्यदूत यू डोंग-वान यांनी केले. दोन्ही देशांमध्ये प्राचीन काळापासून असलेल्या सांस्कृतिक समानता आणि संबंधांना विविध मंचांद्वारे वाढवण्याची गरज असून, त्यासाठी मुंबईमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे प्रयोजन असल्याचेही यावेळी सांगितले.
दक्षिण कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापित इंडो-कोरियन सेंटर संचालित किंग सेजॉंग इन्स्टिट्यूटच्या वतीने बालेवाडी येथे कोरियन भाषेतील वक्तृत्व स्पर्धा यू डोंग-वान यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडली. कोरियन भाषा आणि संस्कृतीचा जागतिक स्तरावर प्रचार होण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. प्रसंगी एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक ही ओके, किंग सेजॉंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम, इंडो-कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीब घटक आदी उपस्थित होते.

 

यू डोंग-वान म्हणाले, “दोन समृद्ध संस्कृतींमधील संवाद वाढवण्यासाठी स्ट्रीट फेस्टिव्हल्सचा, तसेच बॉलिवूड आणि कोरियन चित्रपट उद्योगांमधील सहकार्य गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन मापदंड प्रस्थापित होतील, तसेच दोन्ही देशांमधील पर्यटन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. ही स्पर्धा दोन्ही संस्कृतींना जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. विद्यार्थ्यांना कोरियात राजनैतिक अधिकारी बनता येईल आणि कोरियन कंपन्यांमध्ये उच्चपदांवर संधी मिळतील.”
या स्पर्धेत कोरियन भाषा शिकणाऱ्या १५ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. कठोर निवड प्रक्रियेतून निवडलेल्या या स्पर्धकांनी त्यांची प्रभावी कोरियन भाषिक क्षमता दाखवून दिली. यावेळी कोरियन-भारतीय संमिश्र नृत्य आणि पारंपारिक कोरियन सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत अनन्या आनंद (प्रथम), वैष्णवी गायकवाड (द्वितीय), श्रीया रेवणकर (तृतीय) आणि झैनब शेख व प्राची भगत (उत्तेजनार्थ) यांनी पारितोषिके मिळवली. प्रथम आलेल्या अनन्या आनंद हिला किंग सेजॉंग इन्स्टिट्यूट फाउंडेशन, कोरियाकडून अधिकृत आमंत्रण मिळणार असून, दक्षिण कोरियामध्ये सात दिवसांचा परदेश दौरा करण्याची संधी मिळणार आहे.
ही ओके यांनी बोलताना भाषा शिकण्याच्या व्यापक फायद्यावर भाष्य केले. ते म्हणाले, “असे उपक्रम म्हणजे केवळ भाषा शिकणे नाही, तर भारत आणि कोरिया यांच्यात सांस्कृतिक पूल बांधण्याचे हे काम आहे.” अजू विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य कार्यालयाचे संचालक ली-सिओक-वॉन यांनीही व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी भाषण दिले.
इंडो-कोरियन सेंटरबद्दल (आयकेसी):
युथ बिल्ड फाउंडेशन, पुणे द्वारे संचालित इंडो-कोरियन सेंटर (आयकेसी), भारतीय आणि कोरियन समुदायांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करते. जुलै २०२३ मध्ये, सेंटरला किंग सेजॉंग इन्स्टिट्यूट पुणे म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळाली. भारतातील हे ७ वे ‘आयकेसी’ असून भाषा वर्गांव्यतिरिक्त, संस्था नियमितपणे कोरियन सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करते. हॅनबोक (पारंपारिक पोशाख) घालणे, किमची कार्यशाळा आणि के-पॉप डान्स सेशन्स आदी कार्यक्रमही घेतले जातात. मूळ कोरियन असलेल्या प्रशिक्षकांद्वारे सर्व  वर्ग घेतले जातात. किंग सेजॉंग इन्स्टिट्यूट फाउंडेशन (KSIF) ही दक्षिण कोरियाच्या सांस्कृतिक, क्रीडा आणि पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली सार्वजनिक संस्था असून जगभरात कोरियन भाषा आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी काम करते. फाउंडेशन जगभरात २४८ हून अधिक किंग सेजॉंग इन्स्टिट्यूट्स चालवते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!