spot_img
spot_img
spot_img

नागरी समस्या सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील ; प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची ग्वाही

शबनम न्यूज | प्रतिनिधी

शहराचा बकालपणा रोखण्यासाठी, नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आयुक्तांनी सर्व समस्या समजून घेत त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेऊन नागरी समस्यांवर चर्चा केली. यावेळी शहराच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचत आयुक्तांना निवेदने सादर केली. या समस्या सोडवण्यासंदर्भात प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी आयुक्तांना सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह विविध अधिकारी, माजी नगरसेवक जयंत भावे आदी उपस्थित होते.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “पुण्याचे नागरी जीवन हलाखीचे झाले असून, अशा परिस्थितीत त्याची धुरा नवलकिशोर राम यांच्या खांद्यावर आहे. अनुभवी अधिकारी असल्याने त्यांच्याकडून पुणेकरांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. महापालिका हद्दीत समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. ड्रेनेज लाईन, कचरा, पाणी प्रश्न यामुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. गंगाधाम चौकातील प्रस्तावित उड्डाणपूल का होत नाही, याचा मागोवा घेतला. वडगाव बुद्रुकमधील एका जागेत मशीद बांधली आहे. तिथे अनधिकृतपणे वारंवार भिंत उभारली जाते. ती त्वरित काढली जावी.”

“नदीसुधार प्रकल्पाबाबत सावळा गोंधळ सुरु आहे. पुण्यातील नद्या खूप जुन्या आहेत. मात्र, नदीसुधारच्या नावाखाली नद्यांची वाट लागत आहे. पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. राम नदी नाहीशी झाली, तशी मुळा-मुठा नद्याही संपतील का, याची भीती आहे. नदीसुधार प्रकल्पाची कामे चुकीच्या पद्धतीने झालेले आहेत. त्यामुळे पूरस्थिती निर्माण आहे, याला प्रशासन जबाबदार आहे, हे आयुक्तांच्या नजरेस आणले आहे. तसेच सुस रोड कचरा प्रकल्प भिजत घोंगडे झाले असून, तेथील कचरा प्रकल्प तातडीने हलवावा, त्यासाठी पर्यायी जागेचा विचार व्हावा, अशा सूचना केल्या आहेत,” असे प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.

कोथरूड येथील ‘एमआयटी’ कथित अनधिकृत बांधकामावर, गांधीभवन परिसरात सुरु असलेले अनधिकृत बांधकामे, यासह पुण्याच्या अनेक भागात परवानगी नसताना कामे सुरू आहेत यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कल्याणीनगर भागातील रुफटॉप हॉटेल, पब, रेस्टोरंट, बार यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. वाहतुकीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

माझी भूमिका मांडण्याचा अधिकार
पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्यावे, अशी भूमिका मी मांडल्यानंतर अतिशय खालच्या स्तराला जाऊन काहींनी टीका केली. पोस्टरबाजी केली. हा प्रकार अतिशय निंदनीय आणि संतापजनक असून, महिलांचे खच्चीकरण करणारा आहे. मस्तानी साहेबांचे चरित्रहनन केले गेले. पण त्याही एक योद्धा होत्या. राजघराण्यातील महिला होत्या. त्यामुळे त्यांचाही आदर राखला गेला पाहिजे. आजही तुमचा आंतरजातीय विवाहाला विरोध आहे का, हे यातून दिसते. जगभर फिरताना मी साडीच नेसून जाते, परंतु पोस्टरमधून वेगळे चित्र निर्माण करीत माझी बदनामी करण्याचा प्रयत्न झाला. एकेकाळी ज्यांच्यासोबत काम केले, त्यांच्याकडूनच अशी घटना घडल्याने दुखी झाले. पोलीस प्रशासन यावर योग्य ती कारवाई करेल. महिलांच्या बाबतीत असा विचार करणाऱ्या वृत्तीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी लढा देणार आहे. हे सांगताना कुलकर्णी काहीशा भावुक झाल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!