spot_img
spot_img
spot_img

भारतीयांच्या बौद्धिक संपदेचे व्यावसायिकीकरण आवश्यक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

“बौद्धिक संपदेचा अतिशय समृद्ध वारसा आपल्याला लाभला आहे. या संपदेचा व्यापारवृद्धीसाठी कल्पक आणि फायदेशीर असा वापर आपल्या पूर्वजांनी केला. मात्र मध्ययुगात आपल्याला या वारशाची विस्मृती झाली. आधुनिक काळात या बौद्धिक संपदेचे व्यावसायिकीकरण करणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन बौद्धिक संपदा कायदातज्ज्ञ ॲड. आनंद माहूरकर यांनी केले. “व्यापारी समृद्धीचा मार्ग बौद्धिक संपदेच्या निर्मिती आणि तिच्या कायदेशीर नोंदणीतून जातो”, असेही ते म्हणाले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी ऑफ एमएसएमई अँड स्टार्टअप व आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने आयोजित एक दिवसीय ‘एमएसएमई महोत्सवा’त ॲड. माहूरकर बोलत होते. याप्रसंगी आयसीएआय पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार, उपाध्यक्ष सीए प्रणव आपटे, सचिव सीए नीलेश येवलेकर, खजिनदार सीए नेहा फडके, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य प्रीतेश मुनोत, सीए नंदकुमार कदम, सारिका दिंडोकार, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरचे सहायक संचालक अनिरुद्ध ब्रह्मे, आदी मान्यवर उपस्थित होते. ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, ‘कमिटी ऑफ एमएसएमई अँड स्टार्टअप’चे चेअरमन सीए ग्यानचंद्र मिश्रा, व्हाईस चेअरमन अर्पित काबरा यांच्या मार्गदर्शनात हा महोत्सव झाला.

बौद्धिक संपदा हक्क यावर ॲड. माहूरकर यांनी ऐतिहासिक संदर्भ देत केलेले सादरीकरण आणि इतिहासाचा वर्तमानकालीन धागा जोडण्याची समयसूचकता लक्षणीय होती. ऍड. माहूरकर म्हणाले, “बौद्धिक संपदा आणि बौद्धिक संपदा हक्क, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, हे सुरवातीपासून लक्षात ठेवले पाहिजे. पाषाणयुगातील मानवाने कृत्रिमरीत्या घडवलेली दगडी हत्यारे हे प्राचीन बौद्धिक संपदेचे उत्तम उदाहरण आहे. पुढील काळातही महाराष्ट्रातील कारागिरांच्या घराण्यांनी जपलेली पैठणी वस्त्राची निर्मिती, हेही बौद्धिक संपदेचे आणि हक्कांचे आदर्श उदाहरण आहे. कारागिरांनी पैठणीसाठीचे डिझाईन (उदा. मोर, कोयरी, बुट्टे), रेशनी धागे, वस्त्राला मौल्यवान बनविणारी चांदी व सोन्याच्या तारांची गुंफण, अशी बौद्धिक संपदाही निर्माण केली आणि त्याचे उत्तम पद्धतीने व्यावसायिकीकरणही केले, जे आजही कायम आहे. रेशमी वस्त्रात धातूंचे धागे, हे एकाचवेळी इनोव्हेशन होते, सौंदर्याचा घटक त्यात होता. ते टिकाऊ होते. त्याचा व्यापार सर्वदूर होता. मध्ययुगीन काळातील आक्रमणे आणि नंतर ब्रिटिश राज्य, यामुळे आपल्याला आपल्याच बौद्धिक संपदेचा विसर पडला. त्याचे जागरण आवश्यक आहे. मात्र, आधुनिक काळाला अनुसरून या संपदेला कायदेशीर नोंदणीचे कोंदण गरजेचे आहे’, असे ते म्हणाले. ‘बौद्धिक संपदेची निर्मिती, तिचे प्रमाणीकरण, नोंदणी, ब्रंड आणि व्यापार, यातून उत्तम व्यावसायिकीकरण साध्य होईल’, असे ते म्हणाले.

सीए रणजीत कुलकर्णी यांनी ‘द आर्ट अँड सायन्स ऑफ फिनान्शियल प्रोजेक्शन फाॅर लोन सॅक्शन्स’, या विषयावर मार्गदर्शन केले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या लघु उद्योजकांसाठी तसेच स्टार्टअपसाठी विविध योजना आहेत. त्यांची माहिती करून घेणे आणि त्यानुसार प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे”, असे ते म्हणाले. कर्ज मिळवण्यासाठी प्रकल्प योजना कशी मांडावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या घटकांचा आवर्जून समावेश करावा, आपल्या ग्राहकांना यासंदर्भात नेमका सल्ला कसा द्यावा, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) कसा सादर करावा, अशा मुद्यांवर सीए कुलकर्णी यांनी सादरीकरण केले. उत्तरार्धात सीए प्रमोद जैन यांनी ‘व्हर्च्युअल सीएफओ सर्व्हिसेस’ या विषयावर तर सीए श्रीकांत राठी यांनीही मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक करताना सीए सचिन मिणियार म्हणाले, “लेखापरीक्षणाचा व्यवसाय करणारे आणि नव्याने या क्षेत्रात आलेले, सर्वांनाच या क्षेत्रातील नव्या घटकांची माहिती मिळावी, केंद्रीय मंत्रालयाच्या संबंधित क्षेत्राशी संबंधित योजनांचे आकलन व्हावे, बौद्धिक स्वामित्व हक्काविषयी जागरुकता यावी, एआयचे तंत्र समजून घेता यावे, अशा अनेक उद्देशांनी या एक दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले होते.”

या एमएसएमई महोत्सवात हेल्पडेस्क लावण्यात आला होता. यामध्ये एमएसएमई उद्योगांना उद्यम नोंदणी अद्ययावतीकरण, तक्रार निवारण, केंद्राच्या विविध योजना, त्यासाठी आवश्यक गोष्टी याबाबत जनजागृती करण्यात आली. सीए प्रणव मंत्री यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!