spot_img
spot_img
spot_img

पुणेकरांनी अनुभवली मनोरंजनाची मेजवानी

बालगंधर्व रंगमंदिराचा ५७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

शबनम न्यूज

पुणे : पारंपारिक लावण्या, हिंदी मराठी गाण्यांच्या मैफली, नामवंत कलाकारांसोबत गप्पा, समकालीन सामाजिक घटितांची नोंद घेणारी विविध चर्चासत्रे, आदि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा ५७ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुणेकरांनी मनोरंजनाची मेजवानी अनुभवली.

बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. ’राजकारणा पलीकडचे मुरलीअण्णा’ ही वेगळी मुलाखत या वेळी झाली. महोत्सवाची सुरूवात कविवर्य सुरेश भट यांच्या गजलांचा कार्यक्रम, “शब्दप्रभू जगदीश खेबुडकर”यांच्या गीतांचा कार्यक्रम सादर करून करण्यात आली. तर संध्याकाळी व्यावसायिक नाटकांवर चर्चासत्र संपन्न झाले. ज्यामध्ये विशेष आमंत्रित जेष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सहभागी झाले. प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेरावांच्या गप्पांचा ‘हास्यदिंडीचे मानकरी’ या कार्यक्रमाचा रसिकांनी आनंद घेतला.

दुसऱ्या दिवशी सकाळी एकपात्री प्रयोग सादर करण्यात आले. महोत्सवाचे दरवर्षी एक आकर्षण असणारा फक्त महिलांसाठीचा लावणी महोत्सव रंगला. तर संध्याकाळी “स्त्री आज कितपत सुरक्षित?” या ज्वलंत विषयावर चर्चासत्र झाले. त्यात समाजसेविका अंजली दमानिया, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई व अभिनेत्री दिपाली सय्यद या सहभागी झाल्या. ‘हिंदीची सक्ती कशाला?’ या आजच्या बहुचर्चित विषयावर आयोजित केलेल्या प्रकट संवादामध्ये साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस साहित्य आणि संमेलनाचे माजी अध्यक्ष व भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपली मते परखडपणे मांडली.

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी “महाराष्ट्राची लोकधारा”, “मोगरा फुलला” हे कार्यक्रम संपन्न झाले. तर रात्री”ऑल इज वेल” या चित्रपटातील कलाकारांसोबत मनमोकळ्या गप्पा झाल्या. तीनही रात्री संगीत रजनी आणि कोल्हापूरचा सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स आणि “बॉलीवूड हिट्स”सादर करण्यात आले. याला पुणेकरांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच नव्या जुन्या सदाबहार संगीताची सुरेल सफर गायक स्वरुप भालवणकर यांच्या संगीत रजनीत पुणेकरांनी अनुभवली.

बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा महोत्सव चोख नियोजनात यशस्वी केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!