spot_img
spot_img
spot_img

गीत, संगीत आणि नृत्याविष्कार असलेल्या तालयात्रेच्या बरसातीने रसिक चिंब

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर यांनी सादर केलेल्या अप्रतिम तालरचनेतून आणि बंदिशीतून रसिक चिंब झाले. तर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी सादर केलेल्या बंदिशीच्या आविष्काराच्या मंगलदीपाने वातावरण उजळून निघाले.

पिंपरी चिंचवड महापालिकेने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या बहारदार सोहळ्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. या वर्धापन महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात झाले. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त पंकज पाटील, निलेश भदाणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहाय्यक आयुक्त अतुल पाटील, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्रीडा अधिकारी रंगराव कारंडे, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी अनिता केदारी यांच्यासह रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘तालयात्रा’ने साकारला सुरांचा मोरपिसारा

पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर यांच्या तालयात्रा कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली. पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत तालयात्रेच्या माध्यमातून पंडित तळवलकर व त्यांच्या साथीदारांनी रंगमंचावर जणू स्वरांची एक जादुई मैफलच उभी केली होती. तबल्याच्या लयीत मिसळलेली व्हायोलिनची धून, पियानोच्या सुरांवर नृत्य करणारे घटम, आणि प्रत्येक बंदिशीला रसिकांनी टाळ्यांच्या रूपात दिलेल्या आभाळभर शुभेच्छा, या साऱ्यांनी सभागृह भारून टाकले होते. सोहनी रागातील बंदिश ‘चलो हटो पिया’, तीन ताल राग चंद्रकंस अशा एकामागोमाग येणाऱ्या संगीतमय बंदिशींची रचना म्हणजे जणू भावनांचा प्रवाहच होता, ज्यात उपस्थित प्रत्येक जण आपोआपच चिंब भिजून गेला. तर या बंदिशींवर मौसमी जाजू यांनी कथ्थक नृत्य सादर करीत कार्यक्रमाची उंची वाढवली. भारतीय वाद्यासोबत पाश्चात्य वाद्य वापरून भारतीय संगीताचा तसेच वाद्यांच्या भाषेचा सुंदर आविष्कार या कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांनी अनुभवला. तालयात्रेमध्ये पंडित सुरेश तळवलकर यांना नागेश आडगावकर (सहगायक), सुरंजन खंडाळकर (सहगायक), अभिषेक शिनकर (हार्मोनियम वादन), पुष्कर भागवत (व्हायोलिन वादन), सावनी तळवलकर (तबला वादन), वेदांग जोशी (तबला वादन), पार्थ भूमकर (पखवाज वादन), अभिषेक भुरूख (ड्रम वादन), ईशान परांजपे (कॅजोन), ऋतुराज हिंगे (कलाबाश) यांनी साथसंगत केली.

‘मंगलदीप’चा अलौकिक प्रकाश

मंगलदीप कार्यक्रमात पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा गगनाला भिडणारा तरल स्वर व त्यातून बरसणाऱ्या शास्त्रीय गीतांच्या सरी, आणि रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट यामुळे नाट्यगृहातील वातावरण प्रफुल्लित झाले.
पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी सुमधुर आवाजात भावगीत आणि शास्त्रीय गायनाची बहारदार मैफल सादर केली. हे क्षण नाट्यगृहातील प्रत्येक रसिकाच्या मनात कायमचे कोरले गेले. त्यांच्या स्वरांनी वातावरणात एक अलौकिक शांतता पसरली होती, जणू शब्दांना सूर मिळाले आणि भावनांना बोलकं रूप. ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मनी लागले जिथे लागले’ या सारख्या भावस्पर्शी गीतांनी श्रोत्यांचे डोळे पाणावले, तर शास्त्रीय गायनाच्या बारीकसारीक आलापांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘मंगल चरणा गजानन’, ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ इत्यादी गीतांनी श्रोत्यांची मने जिंकली. मंगलदीपमध्ये पद्मजा फेणाणी जोगळेकर यांना महेश खानोलकर (व्हायोलिन वादन), त्रिगुण पटवर्धन (तबला वादन), मंदार पारखी (सिंथेसायझर वादन), नागेश भोसेकर (तालवाद्य), सोनाली बोरकर (हार्मोनियम वादन), तन्वी जोशी (कोरस), राजू दाभोळकर (साउंड इंजिनिअर) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रम यशस्वितेसाठी संगीत अकादमी पर्यवेक्षक अरुण कडूस, दीपक कन्हेरे, गोरख तिकोने, अनिल जगताप, बन्सी आटवे, बाळाराम शिंदे, सुनील ओहोळ, दीपक जगताप, संगीत शिक्षक समीर सूर्यवंशी, नंदिनी सरीन, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, मिलिंद दलाल, संतोष साळवे, उमेश पुरोहित यांनी परिश्रम घेतले. समन्वयक समीर सूर्यवंशी यांनी संगीत अकादमीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर विकास कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!