spot_img
spot_img
spot_img

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना ‘पीएमपीएमएल’चे मोफत पास द्या!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

इयत्ता ५  ते १२  वीच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) मोफत बस पास सुविधा सुरू करणेबाबत तात्काळ कार्यवाही करावी. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मिळण्याकामी महापालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. या विद्यार्थ्यांपैकी अनेकांना दररोज शाळा, महाविद्यालये किंवा शिकवणी वर्गांमध्ये पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहावे लागते. सध्या पीएमपीएमएल ही सेवा या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरत आहे. यापूर्वी इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५  या शैक्षणिक वर्षाकरिता सवलतीच्या दरामध्ये पास सुविधा होती. ती सुविधा यावर्षी बंद असल्याचे समजले.

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांवर बसभाड्याचा आर्थिक बोजा वाढत आहे. शिक्षणासाठी आवश्यक असलेले साहित्य, शुल्क आणि इतर खर्च यामध्ये बस भाड्याचा भारदेखील मोठा ठरतो. त्यामुळे अनेक होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे शासकीय आणि खासगी शाळांमधील इयत्ता ५ ते १२   वीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२५-२६  शैक्षणिक वर्षाकरिता 100 टक्के मोफत पास सुविधा सुरू करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस सेवेवर पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पास सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी. महापालिकेच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या अनुषंगाने या योजनेची अंमलबजावणी केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य अधिक सुलभ व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही आमदार लांडगे यांनी व्यक्त केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यामातून शहरात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा संचलित केल्या जातात. त्यामध्ये 105 प्राथमिक आणि 18 माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 42 हजार अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. गतवर्षी विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल बस प्रवासासाठी 75 टक्के सवलत योजना होती. यावर्षी 100 टक्के मोफत पास सुविधा द्यावी. ज्यामुळे महापालिका हद्दीलगतच्या विद्यार्थ्यांना बस सुविधा मिळेल आणि शैक्षणिक प्रोत्साहन मिळणार आहे. महापालिका प्रशासन याबाबत सकारात्मक कार्यवाही करेल, असा विश्वास आहे.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!