मुस्लिम शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट
मुंबई : राज्यासह मुंबईतील मशिंदींवर असलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुस्लिम शिष्टमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती, अबू आझमी, नवाब मलिक, झीशान सिद्दीकी, सना मलिक या बैठकीस उपस्थित होते. मशिदींवरून जबरदस्तीने भोंगे उतरवले जात असल्याचा आरोप मुस्लिम संघटनांनी केलाय. तर किरीट सोमय्या यांच्या दबावामुळे पोलीस कारवाई करत असल्याचा दावा ही मुस्लिम संघटनांकडून करण्यात आलाय.
दरम्यान, या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, किरीट सोमय्यांना मशिदीत जाऊ नये, असं स्पष्ट शब्दात सांगितलंय. त्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही उपमुख्यमंत्री म्हणालेत.
किरीट सोमय्यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीम उघडलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितलं आहे. तसंच अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको असं स्पष्ट शब्दात सांगितलं.