शबनम न्यूज | प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात परीक्षा आणि मूल्यमापनविषयक सर्व सेवा आता कागदविरहित केल्या जाणार आहेत. कागदविरहित सेवेसाठी स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करण्यात आले असून, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, परिसंस्थांसाठी संकेतस्थळ २३ जूनपासून कार्यान्वित करण्यात येणार आहे.परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी ही माहिती दिली.
आता परीक्षा विभागाच्या छाननी आणि सारणी कक्षाचे कामकाज कागदविरहित करण्यात आले आहे. त्यासाठी grievance.unipune.ac.in हे स्वतंत्र संकेतस्थळ आणि कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ट्रान्सस्क्रिप्ट, पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रक अशी कागदपत्रे महत्त्वाची असतात. आतापर्यंत विद्यार्थ्यांना या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करून त्या अर्जाची प्रत विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रात जमा करावी लागते. त्यात विद्यार्थ्यांचा वेळ जातो. त्यामुळे ही प्रक्रिया कागदविरहित करण्याचा निर्णय घेण्यात आला.