शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) प्रवासी भाडेवाढ केल्यामुळे दोन आठवड्यांत ‘पीएमपी’चे उत्पन्न वाढले असले, तरी सरासरीच्या तुलनेत प्रवासी संख्येत घट झाली असल्याचे समोर आले आहे.भाडेवाढ केल्यापासून दोन आठवड्यांत सरासरी १५ हजारांहून अधिक प्रवासी घटले आहेत.
एक जूनपासून भाडेवाढ केल्यानंतर १५ जूनपर्यंत पीएमपीची प्रवासी संख्या सरासरी नऊ लाख ९९ हजार ८३० पर्यंत आली. दोन आठवड्यांत सरासरी दोन कोटी ११ लाख ८५ हजार ६४ रुपये उत्पन्न मिळाले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) उपनगरांच्या हद्दीतील विविध ३९२ मार्गांवरून धावणाऱ्या ‘पीएमपी’ची एक जूनपासून प्रवासी भाडेवाढ करण्यात आली.