शबनम न्यूज | प्रतिनिधी
अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ‘सूर्य योग ध्यानाथॉन-२०२५’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. बावधन येथील ‘सूर्यदत्त’च्या बन्सीरत्न सभागृहात ‘समग्र आरोग्यासाठी शरीर आणि मनाचा ताल’ या संकल्पनेवर आधारित मौन पाळत हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. एकविसाव्या शतकातील अद्वितीय असा हा विश्वविक्रमी उपक्रम म्हणून नोंदवला गेला.
यावेळी ‘सूर्यदत्त’च्या शाळा, ज्युनिअर कॉलेज, सिनिअर कॉलेज, फिजिओथेरपी, फार्मसी, सायबर, विधी, हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, आयटी, अशा विविध शाखांतील ९०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, माजी विद्यार्थी, पालक व कर्मचाऱ्यांनी एकत्र येत ९८ मिनिटांपर्यंत सूर्यनमस्कार व योगासने करीत सामूहिकरित्या ९०,००० हून अधिक वेळा ‘ॐ’चा जप केला. हा सामूहिक जप आणि ध्यानाचा अनुभव म्हणजे मन, शरीर आणि आत्मा यांच्यातील समन्वयाचा सर्वोच्च टप्पा होता.
या योग महोत्सवाची सुरुवात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘वन अर्थ, वन हेल्थ’ या विषयावर आधारित ‘भक्तियोग’ सत्राशी ऑनलाइन जोडून झाली. त्यानंतर सानिया पाटणकर व त्यांच्या टीमने सादर केलेल्या सुफळ संगीत प्रार्थनेमुळे सभागृहात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धेचेही आयोजन केले होते. यामध्ये प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्रे आणि रोख बक्षिसांनी गौरविण्यात आले. विजेत्यांमध्ये गार्गी झरे हिने प्रथम, सेजल विटेकर हिने द्वितीय, अनुज शिंगोळे याने तृतीय, संभाजी घोले याने चौथे, तर नीरज बुब याने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
‘सूर्यदत्त’तर्फे दरवर्षी योगदिनी नव्या उपक्रम आयोजिला जातो. याआधी ‘कला आरोग्यम योगाथॉन २०२१’, ‘ताल आरोग्यम योगाथॉन २०२२’, ‘सिद्धमंत्र हास्य क्युरेटिव्ह योगाथॉन २०२३’ आणि ‘सूर्यदत्त योगवारी आरोग्याथॉन २०२४’ यांसारखे कार्यक्रम जागतिक विक्रमांनी सन्मानित झाले आहेत. या परंपरेला पुढे नेत यंदा ‘सूर्य योग ध्यानाथॉन २०२५’ उपक्रम आयोजित केला गेला. यामध्ये ‘ॐ’ जपाला केंद्रस्थानी ठेवून एक अध्यात्मिक व सांघिक अनुभव घडवण्यात आला. अनेक विक्रम नोंदवणाऱ्या संस्थांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून याची दखल घेतली. सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरूनही हजारो पालक, माजी विद्यार्थी व हितचिंतकांनी यामध्ये सहभागी होत कार्यक्रमाचा लाभ घेतला. या ऐतिहासिक उपक्रमासाठी सूर्यदत्त संस्थेला १२ हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रांनी सन्मानित करण्यात आले.
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व पालकांचे अभिनंदन केले. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य संतुलित राहते आणि व्यक्तिमत्त्व घडते. नियमित योग, संतुलित आहार आणि सकारात्मक विचार यामुळे आरोग्यसंपन्न जीवन शक्य होते. योग ही भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी असून, योग जीवनशैलीचा भाग झाल्यास आपण आरोग्य, शिस्त, सकारात्मक विचार आणि सर्जनशीलता प्राप्त करू शकतो. या उपक्रमाच्या तयारीसाठी गेल्या महिनाभरापासून संगीत, योग व साधनेचा संगम साधण्यात आला होता.”
या महोत्सवात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले की, “सामूहिक ‘ॐ’ जपामुळे एकात्मतेची आणि अंतर्मुखतेची अनुभूती मिळाली. योग हा केवळ व्यायाम नसून, तो मनाच्या शांततेकडे नेणारा एक सुंदर प्रवास आहे. अशा प्रकारच्या अभूतपूर्व उपक्रमांमुळे सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स केवळ राष्ट्रीयच नव्हे, तर जागतिक पातळीवर योग, आरोग्य व भारतीय मूल्यांचा जागर घडवत आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.