spot_img
spot_img
spot_img

‘सेवाभाव हा भक्तिभावाइतकाच महत्त्वाचा!’ – ॲड. सतिश गोरडे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

‘सेवाभाव हा भक्तिभावाइतकाच महत्त्वाचा असतो म्हणून विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आषाढी वारीनिमित्त आरोग्यवारी वैद्यकीय सेवाकार्याचा शुभारंभ करण्यात आला आहे!’ अशी माहिती विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहमंत्री आणि सेवा आयाम पालक ॲड. सतिश गोरडे यांनी महासाधू मोरया गोसावी मंदिराचे प्रांगण, चिंचवडगाव येथे शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी दिली. रावेत येथील इस्कॉन श्री गोविंद धामचे अध्यक्ष जगदीश गौरांग प्रभू, ज्येष्ठ उद्योजक नितीन अग्रवाल, ज्येष्ठ कीर्तनकार आणि वीणेकरी ह. भ. प. मधुकरमहाराज मोरे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर बच्चे, ॲड. ललित झुनझुनवाला, माजी प्रांतमंत्री विजय देशपांडे आदी मान्यवरांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.

ॲड. सतिश गोरडे पुढे म्हणाले की, ‘विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गेली ३८ वर्षे देहू – आळंदी व त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या मार्गावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाउली, जगद्गुरू तुकाराममहाराज आणि संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात वारकरी बंधू – भगिनींसाठी अखंड वैद्यकीय तथा आरोग्यसेवा देण्यात येते. या आरोग्यपथकात यंदा ६ रुग्णवाहिका, १३ डाॅक्टर्स, २० परिचारिका आणि अन्य सेवाभावी कार्यकर्ते असा ५० व्यक्तींचा ताफा आहे. त्यांच्यासोबत उत्तम दर्जाची औषधे असून वारीचे संपूर्ण १८ दिवस हा ताफा दिवसरात्र आरोग्य सेवाकार्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर्षी प्लास्टिकमुक्त अन् पर्यावरणपूरक वारीचा संकल्प सोडण्यात आला आहे. आरोग्य उत्तम असेल तरच वारकरी आनंदाने आपली वारी पूर्ण करतील. हे विश्वची माझे घर, असे माउली म्हणतात म्हणून पृथ्वीवरील सर्वांचे आरोग्य चांगले राहावे. पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी या अभंगोक्तीप्रमाणे आमचीसुद्धा आरोग्यवारी चुकवू देऊ नको, अशी पांडुरंगाला विनंती आहे!’ जगदीश गौरांग प्रभू यांनी, ‘जो भक्तांची सेवा करतो तोच माझा खरा भक्त असतो, असे भगवंत म्हणतो!’ असे विचार मांडले. नितीन आगरवाल यांनी, ‘वैद्यकीय सेवेत सहभागी व्हावे असे मनात होते म्हणून एका रुग्णवाहिकेचा पूर्ण खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्याला परिषदेने मान्यता दिल्याने खूप समाधान वाटते आहे!’ अशी भावना व्यक्त केली.

याप्रसंगी संत तुकाराममहाराज सेवाभावी संस्थान, परभणी या वारकरीपथकाला प्रातिनिधिक स्वरूपात औषधांचा खोका मान्यवरांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला; तसेच रुग्णवाहिकांचे पूजन करण्यात आले. डाॅ. शर्वरी यरगट्टीकर यांनी प्रास्ताविकातून, ‘अध्यात्म, वारी आणि सेवाभाव या गोष्टी शाश्वत राहतील!’ अशी भावना व्यक्त केली. दीपप्रज्वलन आणि विठ्ठल – रखुमाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. विश्व हिंदू परिषद पिंपरी – चिंचवड जिल्हा महिला कार्यकर्त्यांनी भक्तिरचनांचे सादरीकरण केले. संयोजनात पी. एन. पुजारी, विजय देशपांडे, यशवंत देशपांडे, काका गोडबोले, अशोक यलमार यांनी परिश्रम घेतले. विश्व हिंदू परिषद पिंपरी – चिंचवड जिल्हामंत्री धनंजय गावडे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!