टाळ-मृदंग अन् हरीनामाचा गजर : आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने सेवा उपक्रम
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
श्रीक्षेत्र देवाची आळंदी येथून प्रस्थान केलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी वारी पायी पालखी सोहळ्याचे मॅगझिन चौक, भोसरी येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या या स्वागत सोहळ्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला.
टाळ-मृदंगाचा गजर आणि हरीनामाचा जयघोष करीत पालखी सोहळा उद्योगनगरीमध्ये दाखल झाला. वारकऱ्यांना पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून छत्र्या, रेनकोटचे वाटप, तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, केळी, फराळ व लाडूंचे वितरण करण्यात आले. याशिवाय हेल्थ चेकअप कॅम्प व वैद्यकीय सेवा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या.
दरम्यान, पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन, पोलीस विभाग, स्वयंसेवी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांचे सुद्धा नियोजन चोख होते. स्थानिक आमदार म्हणून महेश लांडगे यांनी प्रतिवर्षीप्रमाणे सेवा देण्याची भूमिका घेतल्याने उपस्थित भाविकांमध्ये समाधान आणि आनंदाची भावना दिसून आली. सदर स्वागत सोहळ्यास विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ सुद्धा उपस्थित होत्या. त्यांनीही वारकरी भगिनींसोबत फुगडीचा फेर धरला. वारीच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात भक्तीभाव, सेवाभाव आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
समरसतेचे प्रतीक वारी…
संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आणि पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव आहे. नव्हे ती महाराष्ट्राची ओळख आहे. सामाजिक एकोपा, बंधुभाव शिकविणाऱ्या या पालखी सोहळ्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. हा इतिहास संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक श्रीधरबुवा देहूकर आणि त्यांचे चिरंजीव डॉ. सदानंद मोरे यांनी लिहून ठेवला आहे. या संतविचारांनी प्रेरीत होवून आम्ही टाळगाव चिखली येथे भारतातील पाहिले जगद्गगुरू संत तुकाराम महाराज संतीपीठ उभारण्याचा संकल्प केला. संतकृपेने हे ज्ञानमंदिर उभा राहिले आज या ठिकाणी 1600 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. वारीत सहभागी झाल्यानंतर अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणासाठी केलेल्या कार्याचे मनोमन समाधन वाटले, अशा भावना आमदार लांडगे यांनी व्यक्त केल्या आहेत.