शबनम न्यूज
पिंपरी (दिनांक : २० जून २०२५) केदारेश्वर मंदिर ट्रस्ट, भक्ती – शक्ती प्रासादिक दिंडी, भारतीय भूतपूर्व सैनिक संघ आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्राधिकरणात प्रथमच संस्कृती वारी रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार, दिनांक १९ जून २०२५ रोजी श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे, पेठ क्रमांक २४ येथे अपूर्व उत्साहात संपन्न झालेल्या या नेत्रदीपक रिंगण सोहळ्यात सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठांचे मानसपुत्र चंद्रकांत उर्फ बाळा शिंदे, श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू मोरे, भक्ती – शक्ती प्रासादिक दिंडीचे विश्वस्त सल्लागार ह. भ. प. दत्तात्रय जामदार, भारतीय भूतपूर्व सैनिक संघ – पुणे जिल्हा मानद सचिव दत्तात्रय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
टाळ – मृदंगाच्या साथीने देहू – आळंदी येथील वारकऱ्यांनी म्हटलेल्या हरिपाठाच्या अभंगांनी सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. त्यामध्ये पारंपरिक वेषभूषा परिधान करून मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. वरुणराजाच्या सुखद वर्षावात ‘ज्ञानोबा – तुकाराम’ असा जयघोष करीत महिलांनी फुगड्या खेळल्या; तसेच सामुदायिक भक्तिनृत्य केले. त्यानंतर वारकरी पुरुषांनी देखील मनसोक्त फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. सोहळ्यादरम्यान भक्ती – शक्ती प्रासादिक दिंडीसह विविध दिंड्यांचे आगमन झाले. हलगी – पिपाणी आणि पारंपरिक मंगलवाद्यांच्या गजरात दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अभंग अन् भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. प्रांगणात आलेल्या मानाच्या अश्वाचे गुलाब पाकळ्या उधळून तसेच मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. अश्वाने प्रांगणात रिंगण घातले त्यावेळी उपस्थितांनी सामुदायिक जयघोष केला. आरतीने रिंगण सोहळ्याची सांगता करण्यात आली. ह. भ. प. गणेशमहाराज जाधव आणि अंबादास काणे यांनी सोहळ्याचे निवेदन केले.