शबनम न्यूज | प्रतिनिधी
तीर्थक्षेत्र आळंदीत जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे इंद्रायणीनदीचे दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहे. दरम्यान आषाढीपायवारी प्रस्थान सोहळा निमित्ताने इंद्रायणी तरी लाखो भाविकांचा मेळा भरला आहे. यातच एक भाविक इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडली.
सुदैवाने या भाविकाने मोठे धाडस दाखवत जुन्या पुलाशेजारी एका झाडाला पकडले. तात्काळ आळंदी नगरपरिषद व एनडीआरएफच्या पथकाने मोठ्या शिताफीने त्यास पाण्याबाहेर काढून जीवदान दिले. संबंधित भाविकास रुग्णवाहिकेद्वारे आळंदी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
आळंदीसह इंद्रायणी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषता : मावळसह लोणावळा परिसरात पावसाचा वेग जास्त आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीचे दोन्ही पात्र तुडुंब भरून वाहत आहेत. आळंदीतील भक्ती सोपान पुल व भक्त पुंडलिक मंदिर पाण्याखाली गेले आहे. त्रिवेणी भागीरथी कुंडाच्या दगडी घाटावर पुराचे पाणी आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून भाविकांनी इंद्रायणी नदीत जाऊ नये असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी केले होते.