spot_img
spot_img
spot_img

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आपली संस्कृती, संतांचे विचार, परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

श्रीक्षेत्र टाळगाव, चिखली येथे वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित केलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठाच्या कलादालन व सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, संतपीठाचे संचालक डॉ. सदानंद मोरे, चिंतन समिती, संतपीठ समितीचे पदाधिकारी तसेच पालक प्रतिनिधी व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला मोठी संतपरंपरा लाभलेली आहे. संतपरंपरा जपण्याचे काम संतपीठात होणार आहे. या ठिकाणाला वैश्विक स्वरुप देण्याचे काम करण्यात आले असून येथे संपूर्ण संतसाहित्य सीबीएसई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी या चारही भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वाद्य वाजविण्याचे प्रशिक्षणही याठिकाणी देण्यात येणार आहे.

ते म्हणाले, संतपीठाने तयार केलेल्या यापुढील संकल्प आराखड्यानुसार पंढरपूर व आळंदी येथे उभारण्यात येणाऱ्या संतपीठाला महाराष्ट्र शासन पूर्णपणे मदत करेल. सगळ्या ठिकाणचे संतपीठ एकमेकांना पूरक बनविण्यात येतील. नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषा बनविण्याचा मार्ग खुला केला असून मराठीला वैश्विक भाषा, ज्ञानभाषा व अर्थकारणाची भाषा बनविण्याचे दालन खुले केले आहे. हे धोरण महाराष्ट्र शासनाने स्वीकारले असून सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली आहे, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले. इतर भारतीय भाषेचा तिरस्कार करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

संतपीठाचे संचालक डॉ. मोरे म्हणाले, संत परंपरा जपणारी शाळा स्थापन करण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले आहे. संतांचे विचार या संतपीठाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम होणार आहे. विकसित भारताच्या ध्येयपूर्तीसाठी संतपीठाचा मोलाचा सहभाग असेल. संतपीठ समितीच्या यापुढील संकल्पास शासनाने आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ चिखली येथे संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष, संत सोनबा ठाकूर पखवाज कक्ष, पंडीत अरविंद मुळगावकर तबला कक्ष तसेच आलीजाबहाद्दर ह.भ.प. महादजी शिंदे सभागृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण व पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत चालू वर्षात सुमारे १ लाख ५० हजार देशी वृक्ष लागवड करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने वारकरी संप्रदायासोबत अत्याधुनिक शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था विकसित करण्याचा महत्वाकांक्षी उद्देशाने टाळगाव चिखली येथे २३ कोटी ५४ लाख रुपये खर्चाच्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ विकसित केले आहे. यामध्ये तळमजला तसेच ५ मजले असे इमारतीचे नियोजन करण्यात आले असून त्याचे एकूण बांधकाम क्षेत्र १३ हजार १६१ चौरस मीटर आहे. या इमारतीमध्ये ५५ वर्गखोल्या, ९ कार्यालये, ४० इतर खोल्या ज्यामध्ये प्रयोगशाळा, संगणक कक्ष, सभागृह, संगीत तथा वाद्य कक्ष आहेत. प्रत्येक मजल्यावर स्वछतागृहे, विद्यार्थ्यांना खेळण्याकरिता विस्तीर्ण मैदान आदी सुविधा आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांचे भेटीच्या समुहशिल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते पुणे आळंदी पालखी मार्गावर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समूहशिल्प आणि संतसृष्टीचे लोकार्पण करण्यात आले. या संतसृष्टीत विविध संतांच्या जीवनावर आधारित विविध भित्तीचित्रे बसविण्यात आली आहेत. संत नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई व इतर वारकरी २० असे एकूण २५ शिल्पे मिश्र धातूमध्ये बनविण्यात आली आहे. सदर जागेत विविध संतांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित एकुण ४७ कांस्य धातुच्या शिल्पांचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. या कामावर ३० कोटी ६९ लाख रुपये खर्च करण्यात आला

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!