spot_img
spot_img
spot_img

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कुंडमळा दुर्घटनास्थळी भेट

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे साकव पूल पडून झालेल्या दुर्घटनेची माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन घेतली. या ठिकाणी मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, मावळचे प्रांताधिकारी सुरेंद्र नवले आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकारी तसेच स्थानिकांकडून घटनेबाबत तसेच बचाव कार्याबाबत माहिती घेतली. तातडीने धाव घेऊन बचावकार्य केलेल्या स्थानिक नागरिकांना त्यांनी शाबासकी दिली.

यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मावळ तालुक्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बचाव कार्यासाठी अत्याधुनिक वाहन जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल.

घटनेची चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता आदींसह निवासी उपजिल्हाधिकारी यांची समिती नेमली आहे, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

अपघातग्रत पुलाचा उर्वरित सर्व भाग पाडण्यात येणार आहे. याशिवाय आयुष्य संपलेले तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर्स यांनी वापरण्यास धोकादायक असा शेरा दिलेले इतरही सर्व धोकादायक पूल पाडण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार

या ठिकाणी साडेसात मीटर रुंदीचा पूल बांधण्यात येणार असून त्याच्या दोन्ही बाजूला ८ फुटाचे दोन पदपथ करण्यात येणार आहे. तसेच हे पर्यटनस्थळ असल्याने दोन दर्शक गॅलरी (व्यूव्हींग गॅलरी) करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येईल. पावसानंतर तातडीने पुलाच्या कामाला सुरुवात करावी, असे निर्देश यावेळी संबंधित बांधकाम कंत्राटदाराला दिले.

उपमुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयात जखमींची विचारपूस

यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी पवना रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच जखमींवर आवश्यक ते सर्व उपचार होतील याची काळजी घ्यावी, असे डॉक्टरांना निर्देश दिले. या कामात समन्वयाची जबाबदारी प्रांताधिकाऱ्यांवर राहील, असेही ते म्हणाले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!