spot_img
spot_img
spot_img

‘प्रभुणे यांचे कार्य समाजाला दिशादर्शन करणारे!’ – डाॅ. पंडित विद्यासागर

शबनम न्यूज | प्रतिनिधी
 ‘गिरीश प्रभुणे हे कर्मतपस्वी असून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रांतील त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शन करणारे आहे!’ असे गौरवोद्गार रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. पंडित विद्यासागर यांनी सोहम् सार्वजनिक ग्रंथालय, संत तुकारामनगर, पिंपरी येथे सोमवार, दिनांक १६ जून २०२५ रोजी काढले. कलारंजन प्रतिष्ठान आणि सोहम्  सार्वजनिक ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष सत्कार करताना डाॅ. पंडित विद्यासागर बोलत होते. महाराष्ट्र ग्रंथालय सेवानिवृत्त उपसंचालक बाबुराव हंद्राळे, भटक्याविमुक्त चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते महादेव गायकवाड, उपमुख्याध्यापक अविनाश यादवाडकर, प्रा. माधव राजगुरू, प्रा. बाळकृष्ण माडगूळकर, सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष जगन्नाथ नेरकर आणि कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डाॅ. पंडित विद्यासागर पुढे म्हणाले की, ‘केंद्र सरकार कौशल्यावर आधारित नवीन अभ्यासक्रमाची आत्ता आखणी करीत आहे; परंतु पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या माध्यमातून गिरीश प्रभुणे यांनी भटक्याविमुक्त समाजातील पारंपरिक कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाची केलेली अंमलबजावणी हे त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहे!’ याप्रसंगी सोहम् ग्रंथालयाच्या अभ्यासिकेतून अभ्यास करून इयत्ता दहावी, बारावी आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे यांनी आपल्या पन्नास वर्षांच्या सार्वजनिक जीवनाची वाटचाल कथन करून, ‘अक्षरश: चमत्कार वाटावा एवढे समृद्ध ज्ञान भटक्याविमुक्त समाजाकडे आहे. त्यांच्याकडूनच मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या!’ अशी विनम्र भावना व्यक्त केली; तसेच ‘सोहम् सार्वजनिक ग्रंथालय हे केवळ पिंपरी – चिंचवडच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील एक आदर्श ग्रंथालय आहे!’ असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या राधिका पिसे यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगत व्यक्त करताना आपल्या यशात सोहम् ग्रंथालयाचा खूप मोठा वाटा आहे, असे कृतज्ञतापूर्वक नमूद केले. 
दीपप्रज्वलन आणि सरस्वतीपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रीकांत चौगुले यांनी प्रास्ताविकातून, ‘पिंपरी – चिंचवड शहराचा नावलौकिक देशपातळीवर नेण्यात गिरीश प्रभुणे यांचे खूप मोठे योगदान असल्याने सत्काराच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याची सुसंधी आम्ही घेतली!’ अशी भूमिका मांडली. जगन्नाथ नेरकर यांनी ग्रंथालय आणि अभ्यासिकेची माहिती देताना ‘अधिकारी घडविणारी संस्था’ असा सोहमचा समाजात लौकिक प्रस्थापित झाल्यामुळे मनापासून आनंद वाटतो, असे सांगितले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नितीन जाधव यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!