शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा मंगळवार (दि. १७) जून रोजी सायंकाळी चार वाजता भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे, अशी माहिती राष्ट्रवादी पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली आहे. या कार्यकर्त्यां मेळाव्यात शहरातील अनेक मोठ्या नेत्यांचे जाहीर प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये अजित गव्हाणे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. तसेच अजित गव्हाणे यांच्यासोबत वीस ते पंचवीस माजी नगरसेवक राष्ट्रवादीत पुन्हा परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे भोसरी येथे होणाऱ्या या कार्यकर्ता मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत अजित गव्हाणे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला होता. परंतु, आता अजित गव्हाणे हे परत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची ताकद या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
२०१७ च्या निवडणुकीत अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका गमावली होती, ती आता परत मिळवायची असल्याने अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात आपले राजकीय डावपेच टाकण्यास सुरुवात केली आहे. उद्या मंगळवारी होणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात किती नेते प्रवेश करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.