शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग पूर्ण होण्यासाठी आणखी विलंब होणार असून, या प्रकल्पाला मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिला आहे. ‘पीएमआरडीए’कडून हाती घेण्यात आलेल्या २३.३ किलोमीटर अंतराच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे ८५ टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील पूल बांधण्यात आले असून, लोहमार्ग (रुळ) देखील टाकण्यात आले आहेत.
सद्य:स्थितीला २३ स्थानकांवरील सरकते जिने, वाहतूक नियंत्रण दिवे (सिग्नल), विद्युत यंत्रणा आणि इतर किरकोळ दुरुस्तीची कामे अंतिम टप्प्यात असली, तरी या प्रकल्पातील ‘राजभवन’ची जागा सुरक्षेच्या कारणास्तव हस्तांतरित करण्यास नकार देण्यात आला होता.
अखेर फेब्रुवारी महिन्यात ही जागा देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. मात्र, ही जागा केवळ नावालाच हस्तांतरित करण्यात आली. या ठिकाणी काम करण्यास सुरक्षेच्या कारणास्तव नकार मिळत असून, परवानग्यांसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या ठिकाणी स्थानकाचे काम पूर्ण करून मेट्रोची चाचणी याच वर्षी घेण्याचा प्रयत्न असल्याचे ‘पीएमआरडीए’कडून सांगण्यात आले.