spot_img
spot_img
spot_img

आषाढी वारी पालखी सोहळा मार्गाची अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडून पाहणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी १९ जून रोजी तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी २० जून रोजी पिंपरी चिंचवड शहरात येणार आहे. या सोहळ्याच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवड महापालिका सज्ज असून पालखी मार्गावर,
मुक्कामाच्या ठिकाणी तसेच वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळाची, तसेच पालखी मार्गाची पाहणी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केली. या पाहणी दौऱ्यावेळी सह शहर अभियंता बापू गायकवाड, देवन्ना गट्टूवार, आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार, उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, मुख्य सुरक्षा
अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कर्मचारी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी ‘पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही, याची दक्षता संबंधित विभागांनी घ्यावी. सर्व विभागांनी समन्वयाने वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचे नियोजन करावे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पावसाळ्याच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापनासाठी लागणारी यंत्रणा सज्ज ठेवावी. पिण्याचे पाणी, तातडीच्या वैद्यकीय सुविधा, वारकरी निवास आणि पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी,’ असे निर्देश संबंधित अधिका-यांना पाहणी दौऱ्यादरम्यान दिले.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यासाठी महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती शक्ती याठिकाणी स्वागतकक्ष उभारला जातो. येथे करण्यात येणाऱ्या व्यवस्थेबद्दलची माहिती पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी घेतली. पालखी मार्गावर पावसाचे पाणी कोठेही तुंबणार नाही, याचीही दक्षता घेण्याबाबत सूचनाही त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!