spot_img
spot_img
spot_img

इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बायपास रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणे आवश्यक आहे. त्यासाठी मोरबा रोड ते मुंबई-गोवा हायवे रस्ता, साईनगर कालवा ब्रिज ते उत्तेखोल कालवा गावापर्यंतचा रस्ता आणि निजामपूर रोड कालवा ते भादाव रस्ता हे माणगाव नगरपंचायत हद्दीतील तीन रस्ते आणि मुंबई – गोवा महामार्गावरील इंदापूर कॅनल रस्ता ते विगवली फाटा रस्ता, अशा चारही रस्त्यांच्या कामांसाठी आवश्यक १५ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ही कामे पूर्णत्वास नेण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग इंदापूर बायपास, माणगाव बायपास रस्त्यांच्या कामासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव राजेश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) संजय दशपुते, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे, रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभाग, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

१८ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील या महामार्गाच्या कामाची हवाई व प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिल्यानुसार, आज मंत्रालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माणगाव, इंदापूर येथील वाहतूककोंडी, पर्यायी मार्ग याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ज्या कामांसाठी राष्ट्रीय महामार्गतर्फे निधी उपलब्ध होऊ शकत नाही, त्यासाठी राज्य शासन निधी उपलब्ध करून देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वस्त केले.

या महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये जास्तीचे मनुष्यबळ तैनात करण्यासंदर्भात रायगडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दक्षता घेण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!