spot_img
spot_img
spot_img

पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या देशी झाडांची लागवड व्हावी ; प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
“माणसाने सिमेंटचे जंगल उभारताना नैसर्गिक संपत्तीवर आघात केला. त्यामुळे निसर्गाचा, पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. जागतिक तापमान वाढ, प्रदूषणाची समस्या जगभर सतावत आहे. अशावेळी पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या सुवर्णपिंपळ, वड, आंबा, चिंच, बांबू यांसारख्या देशी झाडांची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायला हवी,” असे प्रतिपादन राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले. पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणाऱ्या ‘जागर पर्यावरणाचा’सारख्या कार्यक्रमाची आज गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
पद्मा प्रतिष्ठान व ज्ञानमाऊली फाऊंडेशन आयोजित ‘जागर पर्यावरणाचा’ कार्यक्रमावेळी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी बोलत होत्या. या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, उद्योजक जवाहरशेठ चोरगे, चाटे शिक्षण संस्थेचे प्रा. फुलचंद चाटे, पद्मा प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत कांबळे, ज्ञानमाउली फाउंडेशनच्या संस्थापिका पुष्पा रणदिवे-कांबळे, पर्यावरण तज्ज्ञ प्रभाकर कुकडोलकर, उद्योजक नितीन हणमघर, हेमंत कांबळे आदी उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणात जागतिक पातळीवर योगदान देत असलेले ट्रीमॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा यांच्यासह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, उद्योजक तुषार गोसावी, माजी नगरसेविका ज्योती गोसावी, राष्ट्रीय खेळाडू प्रियांका यादव व मयानी कांबळे, गायिका मनीषा निश्चल, सोनाली कांबळे यांना ‘जागर पर्यावरणाचा’ सन्मान देऊन गौरविण्यात आले. सिंहगड रस्त्यावरील मोंटेरोजा सोसायटी क्लब हाऊसमध्ये हा कार्यक्रम झाला. ज्ञानगंगोत्री विशेष मुलांची निवासी शाळा संस्थेला ५१ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले.
प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “प्रत्येकाने एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा निश्चय करावा. निसर्गातील प्रत्येक घटकाचे, अगदी कीटकाचेही अनन्यसाधारण स्थान आहे. एकेकाळी पुण्याचे पर्यावरण देशात आदर्श मानले जात होते. अलीकडे पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणात होत आहे. हे टाळण्यासाठी येथील वनराई, टेकडी जतन करण्याची जबाबदारी आपली आहे.”
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “वाढदिवसाच्या निमित्ताने पर्यावरणाचा जागर करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आपले आरोग्य चांगले राहायचे असेल, तर पर्यावरणाचे संवर्धन खूप गरजेचे आहे. प्रदूषणाच्या अनेक समस्या माणसाला सतावत आहेत. त्यामुळे आजूबाजूला खूप झाडे लावण्याची गरज आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण यज्ञात सहभाग घेतला पाहिजे.”
विष्णू लांबा म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये एक लाख झाडे लावण्याचा संकल्प कांबळे यांनी हाती घेतला आहे. वृक्षरोपणाच्या या मोहिमेचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. ‘जागर पर्यावरणाचा’ हा कार्यक्रम या मोहिमेचा शुभारंभ आहे. केक कापून, नको तिथे पैशांची उधळपट्टी करून वाढदिवस करण्यापेक्षा हा उपक्रम अतिशय विधायक असा आहे.”
धीरज घाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. शशिकांत कांबळे यांनी स्वागत केले. जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले. मोनिका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. पुष्पा रणदिवे-कांबळे यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!