शबनम न्यूज | प्रतिनिधी
राज्यातील अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या सुधारित वेळापत्रकानुसार नियमित पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्तायादी बुधवारी (११ जून) जाहीर करण्यात येणार आहे. १२ ते १४ जून दरम्यान शून्य फेरीतील प्रवेश, तर २७ जून ते ३ जुलै या कालावधीत पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यानंतर पहिल्या फेरीची तात्पुरती गुणवत्तायादी शनिवारी जाहीर करून त्यावर हरकती, सूचना मागवण्यात आल्या होत्या. बुधवारी अंतिम गुणवत्तायादी प्रसिद्ध होण्यासह शून्य फेरीअंतर्गत व्यवस्थापन कोटा, अल्पसंख्याक कोटा, संस्थांतर्गत कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशाचे वाटप केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना १२ ते १४ जून या कालावधीत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून, कागदपत्रे पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानंतर १७ जूनला केंद्रिभूत प्रवेशांतर्गत गुणवत्तायादीच्या आधारे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप केले जाणार आहे. २६ जूनला प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी महाविद्यालय वाटप यादी जाहीर केली जाणार आहे.तसेच फेरीनिहाय पात्रता गुण संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील, तर २७ जून ते ३ जुलै या कालावधीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे पडताळणी करून, शुल्क भरून प्रवेश निश्चित करता येणार आहे.