spot_img
spot_img
spot_img

उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-३ या पुस्तकाचे प्रकाशन

शबनम न्यूज | प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-३ या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आले.
पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला आमदार बापूसाहेब पठारे, आमदार शंकर मांडेकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री. पवार यावेळी म्हणाले, धडपड भाग तीन या पुस्तकाचे लेखक श्याम दौंडकर यांची एक रिक्षा चालकापासून ते जिल्ह्यातल्या पत्रकारितेपर्यंतची वाटचाल नक्कीच खडतर होती. पत्रकार म्हणून त्यांनी अनेक वर्ष जिल्हा परिषद बीट सांभाळले असून त्यामुळे त्यांचा संपर्क वाढला, अनेक क्षेत्रातील लोकांशी त्यांचा संपर्क आला, जिल्ह्याचे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या लेखणीतून समाजासमोर मांडले, ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ग्रामीण भागाची जाण असलेले पत्रकार म्हणून दौंडकर यांच्याकडे बघितले जाते. पुस्तक लिहीत असताना त्यांनी कोणतेही बंधन स्वतःवर घातले नाही, असे ते म्हणाले.
धडपड भाग-३ या पुस्तकात दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या गाथा त्यांनी सर्वांच्या समोर ठेवण्याचा, उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अत्यंत गरिबीतून ते पुढे आले असून त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर कष्टाच्या व संघर्षाच्या जोरावर पत्रकारितेसारख्या बुद्धिवंतांच्या क्षेत्रात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. श्री. दौंडकर यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या लेखणीचा वापर केला असून त्यातून त्यांनी लोकांचे प्रेम आदर सन्मान मिळविला आहे. पुस्तक लिखाणाबद्दल त्यांना जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने शुभेच्छा देऊन श्री. पवार यांनी पुस्तकाच्या प्रकाशकांचे सुद्धा अभिनंदन केले.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या शेवटी धडपड भाग-३ पुस्तक देऊन मान्यवरांचा व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत विशेष यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. राजेंद्र खांदवे पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!