spot_img
spot_img
spot_img

विधी विद्यार्थ्यांनी घेतली आयुक्तांची शाळा!

शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘पिंपरी – चिंचवड शहराच्या सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध आहे!’ अशी ग्वाही पिंपरी – चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी महापालिका मुख्य प्रशासकीय इमारत सभागृह, पिंपरी येथे सोमवार, दिनांक ०९ जून २०२५ रोजी दिली. दर्द से हम दर्द तक ट्रस्ट आणि विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या तरतुदी आणि अंमलबजावणी’ या विषयावरील मार्गदर्शनपर 
व्याखानातून शेखर सिंह यांनी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि नवोदित वकील यांच्याशी सुसंवाद साधला. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मार्मिक आणि बेधडक प्रश्न विचारून आयुक्त शेखर सिंह यांची शाळा घेतली; परंतु शेखर सिंह यांनी प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तर दिले. विधी सेवा प्राधिकरण पुणे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, सचिव सोनल पाटील यांचे मार्गदर्शनाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उद्योगपती बधुवेल बलिद, दर्द से हम दर्द तक ट्रस्टचे ॲड. सतिश गोरडे, ॲड. हिमांशु माने यांची प्रमुख उपस्थिती होती. 
पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील जनतेच्या तक्रारींवर कसे लक्ष ठेवले जाते आणि प्रत्येक समस्या कशा पद्धतीने सोडविली जाते याविषयी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना शेखर सिंह यांनी सविस्तर उत्तर देताना पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ‘सारथी’सारख्या तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत संगणकीय कार्यप्रणालीचा वापर करून जनतेने पाठविलेल्या प्रत्येक तक्रारीची वर्गवारी करून दखल घेते. पाणीपुरवठा, स्वच्छता आणि साफसफाई यासारख्या मूलभूत सुविधांचा प्राधान्याने निपटारा केला जातो. ज्या समस्या प्रलंबित आहेत त्यांचा विभागनिहाय पाठपुरावा केला जातो. याबाबत अधिकाऱ्यांच्या कामगिरीनुसार आणि केलेल्या उपाययोजनांबाबत पाच गुण कमी केले जातात. त्यामुळे प्रशासकीय वचक राहतो आणि समस्या दीर्घकाळ प्रलंबित राहत नाहीत, अशी माहिती शेखर सिंह यांनी दिली.
कार्यक्रमाच्या संयोजनात ॲड. खेताराम सोळंकी, ॲड. सोहम यादव, ॲड. संकेत राव, ॲड. महेश सोनवणे, ॲड. हृषीकेश शर्मा यांनी सहकार्य केले. अनुष्का शिंदे यांनी सूत्रसंचालन व हरदित सिंग यांनी आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!